लवकरच ‘गो इंडिया’ स्मार्ट कार्डद्वारे मिळेल रेल्वे तिकीट
By admin | Published: January 31, 2015 12:37 AM2015-01-31T00:37:35+5:302015-01-31T00:37:35+5:30
किमान २0, जास्तीत जास्त पाच हजारांपर्यंत करता येईल रिचार्ज.
अकोला : रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना यापुढे खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यांना केवळ 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड त्यांना बाळगावे लागेल. त्याचा फायदा म्हणजे, रांगेत तिकीट काढताना सुट्या पैशांच्या कटकटीतून कायमची सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासन ही सुविधा लवकरच संपूर्ण देशात सुरू करणार असल्याची माहिती आहे.
'गो इंडिया'या स्मार्ट कार्डद्वारे सामान्य आणि आरक्षित अशी दोन्ही प्रकारची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. या कार्डद्वारे प्रवाशांना क्लॉक रूम व रिटायरिंग रूमचे बुकिंग करण्याची सुविधादेखील मिळेल. विशेष बाब म्हणजे, या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करणार्या प्रवाशास पाच टक्के सूट मिळणार आहे. स्मार्ट कार्ड योजनेच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेच्या संगणकीय प्रणालीत विशेष बदल करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने २३ जानेवारी रोजी जारी केले असल्याची माहिती आहे. प्रायोगिक तत्त्वावर 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड योजना मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या देशातील दोन प्रमुख रेल्वे मार्गांवर राबविण्यात येणार आहे. या प्रथम टप्प्यात संबंधित सर्व अडचणी दूर केल्या जातील. त्यानंतर दुसर्या टप्प्यात ही योजना संपूर्ण देशत लागू केली जाणार आहे.