लग्नातील दागिने चोरणारा चोरटा कोठडीत
By Admin | Published: July 19, 2016 01:56 AM2016-07-19T01:56:42+5:302016-07-19T01:56:42+5:30
एक सुधारगृहात तर तिसरा आरोपी अद्यापही फरार
अकोला: रायली जिन परिसरातील ओसवाल भवनमधील एका विवाह सोहळय़ातील सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरणार्या दोन अट्टल चोरट्यांना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एका आरोपीस २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसरा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. या प्रकरणातील एक अट्टल चोरटा अद्यापही फरार आहे.
जुने शहरातील रहिवासी संदीप दिवेकर यांच्या चुलत भावाचे ओसवाल भवन येथे १३ जुलै रोजी लग्न होते. त्यामुळे मुलीकडील मंडळी व मुलाकडील मंडळी दाग-दागिने घेऊन ओसवाल भवन येथे आले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये चोरट्यांनी पाच सोन्याच्या अंगठय़ा, दोन सोन्याचे गोप, सोन्याचा चपळा हार, सोन्याचा राणी हार, सोन्याचे नेकलेस, सोन्याचे कानातले पाच ग्रॅम आणि नगदी ८३ हजार, असा एकूण ३ लाख २१ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. हा ऐवज चोरी गेल्यानंतर संदीप दिवेकर यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. घटनेनंतर तीन दिवसांच्या आतच पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. इराणी झोपडपट्टीतील गुलाम हसन औलाद हसन, खोलेश्वरमधील करण दशरथ वाघमारे या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहे; मात्र रोख रक्कम घेऊन तिसरा चोर फरार आहे. गुलाम हसन याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.