दक्षिण मध्य रेल्वे दिल्लीला जाण्याकरिता सोडणार २४ विशेष गाड्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:21 PM2018-05-05T14:21:33+5:302018-05-05T14:21:33+5:30
अकोला : दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्यावतीने दिल्लीला जाण्याकरिता २४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्यावतीने दिल्लीला जाण्याकरिता २४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्यांनिमित्त दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये भरपूर गर्दी होत आहे. यामुळे दिल्ली, आग्रा, भोपाळ, मथुरा, झांशी आदी ठिकाणी जाण्याकरिता विशेष गाडी चालविण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. याबाबत खासदार संजय धोत्रे यांचा दक्षिण मध्य रेल्वेकडे सतत पाठपुरावा सुरू होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नांदेड येथून दिल्लीला जाण्याकरिता मे, जून आणि जुलै महिन्यात जवळपास २४ विशेष गाड्या सोडण्याचे ठरविण्यात आले आहे.
गाडी संख्या ०२४८५ नांदेड ते हजरत निझामुद्दीन ही गाडी नांदेड रेल्वेस्थानकातून दर गुरुवारी रात्री २३.०० वाजता सुटेल. त्यानंतर पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला खांडवा, इटारसी, भोपाळ, झांशी, आग्रा, मार्गे निझामुद्दीन येथे शनिवारी रात्री २.०० वाजता पोहोचेल. ही गाडी नांदेड येथून दिनांक १०, १७, २४, ३१ मे, ७, १४, २१, २८ जून आणि ५, १२, १९, २६ जुलै २०१८ रोजी सुटेल.
गाडी संख्या ०२४८६ निझामुद्दीन ते नांदेड विशेष गाडी निझामुद्दीन रेल्वेस्थानकावरून दर शनिवारी सकाळी ०५.५० वाजता सुटेल. त्यानंतर आग्रा, झांशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे रविवारी सकाळी ०७.०० वाजता पोहोचेल. ही गाडी निझामुद्दीन येथून दर शनिवारी दिनांक १२, १९, २६ मे, २, ९, १६, २३, ३० जून आणि ७, १४, २१, २८ जुलै -२०१८ रोजी सुटेल. या गाडीस एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय श्रेणी वातानुकूलित, सात द्वितीय श्रेणी शय्या, सहा जनरल आणि दोन एसएलआरचे असे १७ डब्बे असतील.