दक्षिण झोन; मालमत्ताधारकांना सोमवारी नोटिस!
By admin | Published: June 9, 2017 03:55 AM2017-06-09T03:55:59+5:302017-06-09T03:55:59+5:30
मनपाचा निर्णय; पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील पूर्व झोनमध्ये मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस दिल्यानंतर प्रशासनाने नागरिकांचे आक्षेप स्वीकारले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दक्षिण झोनमधील मालमत्ताधारकांना पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस देण्याची तयारी मनपाने सुरू केली असून, येत्या सोमवारपासून नोटिसचे वितरण केले जाणार असल्याची माहिती आहे.
महापालिका प्रशासनाने १९९८ पासून शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले नाही. निवडणुकांमध्ये मतांचे समीकरण बिघडणार, या भीतीपोटी सर्वपक्षीय नगरसेवकांनीदेखील कधी टॅक्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. शहराप्रती आपले दायित्व काय, याचा अकोलेकरांनादेखील विसर पडल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. शहराचा विकास करायचा असेल तर शासनाच्या निधीत मनपाचा आर्थिक हिस्सा जमा करावाच लागेल, अशी भूमिका घेत शासनाने मनपाला उत्पन्न वाढीच्या कानपिचक्या दिल्या. त्यानुषंगाने मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ह्यजीआयएसह्ण प्रणालीद्वारे मालमत्तांचा सर्व्हेकरून पुनर्मूल्यांकन केले.
पहिल्या टप्प्यात पूर्व झोनमधील २३ हजार मालमत्ताधारकांना नोटिसचे वितरण करण्यात आले. प्रशासनाने १९ वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पारदर्शीपणे चटई क्षेत्रानुसार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत घर, इमारतींचे मोजमाप केले. शिवाय सुधारित करवाढीचा निर्णय घेतला. या दोन्ही बाबी एकाच वेळेस झाल्यामुळे अकोलेकरांमध्ये टॅक्स वाढीबाबत संभ्रम निर्माण झाला. नागरिकांना दिलेल्या नोटिसवर त्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी मनपाने ५ जूनपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपली असून, आता प्रशासनाने दक्षिण झोनमधील नागरिकांना पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस देण्याची तयारी सुरू केली आहे.
पूर्व झोनमध्ये ५ हजार ४८० आक्षेप
४पूर्व झोनमध्ये २३ हजार मालमत्ताधारकांपैकी ५ हजार ४८० मालमत्ताधारकांनी मनपाच्या करवाढीवर आक्षेप नोंदविले. यातील १ हजार ३९० आक्षेप लक्षात घेता संबंधितांच्या मालमत्तांची पुन्हा पाहणी केली जाणार आहे. सर्व्हे करताना संबंधित काही घर मालक बाहेरगावी गेले होते. काही ठिकाणी हिस्से वाटणीचा मुद्दा असून, भाडेकरी आहेत किंवा नाही, आदी मालमत्तांची तपासणी केली जाईल.
मुख्य रस्त्यांलगत जादा टॅक्स कसा?
मुख्य रस्त्यालगतच्या इमारतींना जादा कर आकारणी करण्यावर नागरिकांचे आक्षेप आहेत. सद्यस्थितीत शहराच्या मध्यभागातील गांधी रोड, मोहम्मद अली चौक, राम नगर, जठारपेठ परिसर, गोरक्षण रोड, रामदास पेठ परिसरातील जमिनींचे भाव शहराच्या इतर भागातील मालमत्तांच्या तुलनेत अधिक आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांलगतच्या जमिनींचे भाव लक्षात घेऊन कर आकारणी करण्यात आल्याची माहिती आहे.
खोल्या २० अन् टॅक्स फक्त २०० रुपये!
मालमत्ता कराची दक्षिण झोनमध्ये सर्वाधिक चोरी केली जाते. सिंधी कॅम्प, कच्ची खोली, पक्की खोली आदी भागातील मालमत्तांना नगण्य कर आकारणी केली आहे. या ठिकाणी २० पक्क्या खोल्या असताना फक्त २०० रुपये टॅक्सची आकारणी करण्यात आल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतील. त्यामुळे मनपाचे आणखी किती काळ आर्थिक शोषण करायचे, यावर अकोलेकरांनी चिंतन करण्याची गरज आहे.