पेरलेल्या बियाणे, रोपांचा करा कीटकांपासून बचाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:52 PM2020-06-22T17:52:34+5:302020-06-22T17:52:41+5:30
शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.
अकोला : विदर्भातील बहुतांश भागात खरीप पिकाची पेरणी झाली असून, पेरलेल्या बियाण्यावर रोपावस्थेत विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामध्ये विविध पक्ष्यांसह खार, वाणी, नाकतोडे, वायरवर्म (काळी म्हैस) इत्यादींपासून बियाण्याचे नुकसान होत आहे. शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.
शेतात पेरलेले महागडे बियाणे पक्ष्यांसह उंदीर व विविध प्रकारच्या कीटकांपासून फस्त होत आहे. या किडी बहुभक्षी असून, त्यांचा एकदल, द्विदल, डाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर प्रादुर्भाव दिसून येत आहे. पक्षी विशेषत: कमी ओलाव्यात बियाणे व्यवस्थित खोलीत न पडल्यास किंवा बियाणे व्यवस्थित झाकले न गेल्यास ते दाणे वेचून खातात. तर खार दाणे उकरून खाते. पावसाळ्यात सुरुवातीला वाणीचे समूह शेतात दिसतात. वाणी रोपट्यांच्या बुंध्याशी डोके खुपसून आत शिल्लक असलेला दाणा खातात. कालांतराने अशी रोपे सुकतात. वाणी ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. याशिवाय जमिनीवरील नाकतोडे रंगाने काळे असून, ते कमी अंतराच्या उड्या मारतात व जमिनीतील दाणे खाऊन नुकसान करतात. वायरवर्म (काळी म्हैस) ही कीड कोलीओप्टेरा वर्गातील असून, हिच्या अनेक प्रजाती आहेत. या किडींचे प्रौढ (काळी म्हैस) भुरकट ते काळ््या रंगाचे असतात. ही कीड मुख्यत: अळ््या (वायरवर्म) अंकुरलेली दाणे खातात. तर प्रौढ रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडतात, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
असे करा व्यवस्थापन
- पक्षी व खारीपासून पीक वाचविण्यासाठी शेताची राखण करावी
- शेतातील वाणीचे समूह गोळा करून नष्ट करावे
- सेंद्रिय पदार्थ, पिकांचे अवशेष व किडींची हंगामापूर्वी विल्हेवाट लावा
- न कुजलेल्या सेंद्रिय खताचा वापर करू नये. त्यामुळे वाणी, वायरवर्मचे प्रजोत्पादन होते
- नाकतोड्याच्या नियंत्रणासाठी धुºयावरील गवताचा वेळोवेळी नायनाट करा.
- जमिनीला भेगा पडल्यास उपलब्धतेनुसार पिकास ओलीत करावे.