अकोला जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:05 PM2018-06-26T16:05:33+5:302018-06-26T16:08:23+5:30
अकोला : पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटून गेले; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांसाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अकोला : पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटून गेले; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांसाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
गत १ जूनपासून पावसाळा सुरू झाला २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; परंतु जिल्ह्यातील सातही तालुक्यात सार्वत्रिक दमदार पाऊस अद्याप बरसला नाही. पेरणीलायक पाऊस झाला नसल्याने, खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या. गत १९ व २० जून रोजी जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर काही भागात खरीप पेरण्यांना सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून, त्या तुलनेत २५ जूनपर्यंत १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर (३० टक्के)पेरण्या आटोपल्या. त्यामध्ये पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर व अकोला तालुक्यात पूर्व भागातील पेरण्यांचा समावेश असून, अकोट व तेल्हारा तालुक्यात पेरण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित ७० टक्के पेरण्या मार्गी लागणे अद्याप बाकी असून, पेरणीलायक पाऊस झालेल्या जिल्ह्यातील काही भागात खरीप पेरण्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी, जिल्ह्यातील सातही तालुक्यात रखडलेल्या पेरण्या मार्गी लागण्यासाठी सार्वत्रिक आणि दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
अकोल्यात धुवाधार पाऊस;
१४ मी.मी.पावसाची नोंद !
सोमवारी सायंकाळी अकोला शहर आणि परिसरात धुवाधार पाऊस बरसला. सायंकाळी ६.२० ते ७ वाजेपर्यंत अकोला परिसरात १४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत अकोल्यात रिमझिम पाऊस सुरूच होता. शहरासह जिल्ह्यातील काही भागातही रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.