पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात
By संतोष येलकर | Published: July 21, 2023 07:40 PM2023-07-21T19:40:40+5:302023-07-21T19:40:54+5:30
पिके पाण्याखाली, पेरणीचा कालावधी संपल्यात जमा
संतोष येलकर, अकोला: जिल्ह्यात १८ जुलै रोजी बरसलेला धो धो पाऊस आणि नदी व नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात विविध भागात पिके पाण्याखाली बुडाल्याने, पेरणीचा खर्च पाण्यात गेला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. मात्र, खरीप पीक पेरणीचा कालावधी संपल्यात जमा असल्याच्या पार्श्वभूमीवर आता दुबार पेरणी करणार कशी, याबाबतचा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्याचे वास्तव आहे.
यंदाच्या पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या महिनाभराच्या कालावधीत पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी रखडली होती. गेल्या २ जुलैपासून रिमझिम पावसाने हजेरी सुरू केल्याने, रखडलेली पेरणी सुरू झाली.
निम्म्यापेक्षा अधिक पेरणी पूर्ण झाली असतानाच गेल्या १८ जुलै रोजी रात्रभर जिल्ह्यात धुवाधार पाऊस बरसला. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यासह आठ महसूल मंडळांच्या परिसरात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. जोरदार बरसलेला पाऊस आणि नदी व नाल्यांना पूर आल्याने, नदी व नाल्याकाठच्या भागात शेतजमीन पिकांसह खरडून गेली. तसेच विविध भागात पाऊस आणि पुराचे पाणी शेतात साचल्याने, पेरणीनंतर उगवलेली पिके पाण्याखाली गेली. पिके पाण्यात बुडाल्याने, पिकांच्या पेरणीसाठी केलेला खर्चही पाण्यात गेला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र, तुरीचे पीक वगळता सोयाबीन व कपाशी पीक पेरणीचा कालावधी संपल्यात जमा असल्याने, आता दुबार पेरणी करणार कशी आणि दुबार पेरणीचा खर्च भागविणार कसा, असा पेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
हेक्टरी २५ ते २७ हजार रुपये - पेरणीचा खर्च गेला पाण्यात!
सोयाबीन पिकांच्या पेरणीसाठी प्रती हेक्टर १० हजार रुपयांचे बियाणे, पाच हजार रुपयांचे खत, पाच हजार रुपये पेरणीपूर्व मशागत आणि पाच हजार रुपये पेरणीचा खर्च, असा एकूण सोयाबीन पेरणीसाठी केलेला हेक्टरी २५ हजार रुपयांचा खर्च पाण्यात गेला.
कपाशी पिकाच्या पेरणीसाठी प्रती हेक्टर १२ हजार रुपयांचे बियाणे, पाच हजार रुपयांचे खत, पाच हजार रुपये पेरणीपूर्व मशागत आणि पाच हजार रुपये पेरणीचा खर्च, असा एकूण कपाशी पेरणीसाठी केलेला हेक्टरी २७ हजार रुपयांचा खर्च पाण्यात बुडाला आहे, असे रामगाव येथील शेतकरी शिवाजीराव भरणे यांनी सांगितले.