अकोला जिल्ह्यात पिकांची पेरणी ८७ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:04 PM2019-07-31T14:04:53+5:302019-07-31T14:05:03+5:30
ल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी ८७ वर पोहोचली आहे.
अकोला: सुरुवातीपासूनच पावसाने काही तालुक्यात दडी मारल्याने त्या भागातील पेरण्यांची गती मंदावली. गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी ८७ वर पोहोचली आहे. त्याचवेळी दोन तालुक्यातील पेरणी ७७ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
पावसाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका पेरणीला बसला आहे. त्यातच तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील काही भागातील पेरणीला बराच विलंबही झाला. ३० जूनपर्यंतही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी पीक पद्धतीत ऐनवेळी बदल करण्याचीही वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यासाठी बाजारातून त्या-त्या बियाण्यांची खरेदीही करावी लागली. जिल्ह्यात ४ लाख ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठीचे नियोजन कृषी विभागाने केले. त्यासाठी विविध प्रकारच्या वाणाचे बियाणे, खतांची उपलब्धता ठेवण्यात आली; मात्र पाऊसच वेळेवर नसल्याने पेरणीचा मोठाच गोंधळ उडाला. पेरणीच्या सुरुवातीपासून २९ जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ५२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्याकडे आहे. एकूण ८७ टक्के क्षेत्रात पेरणी झाल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत पाऊस समाधानकारक असल्याचेही ते म्हणाले.