अल्प पावसातच केली शेतकऱ्यांनी पेरणी!
By admin | Published: June 30, 2017 01:38 AM2017-06-30T01:38:20+5:302017-06-30T01:38:20+5:30
तापमानात वाढ; बियाणे कुजण्याचे प्रकार वाढले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षी दमदार पावसाच्या भाकितामुळे शेतकऱ्यांनी अल्प पावसानंतर पेरणी केली आहे; परंतु पावसाने दडी मारली असून, तापमानातही वाढ झाल्याने पेरलेले बियाणे कुजण्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली; पण पुन्हा पाऊस गायब झाला आहे.
मान्सूनच्या पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी खरीप पिकांचीही पेरणी केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पिकांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात जून महिना संपत आला, तरी पेरणीलायक पाऊस नाही, त्यामुळे ६० टक्क्यांवर पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मान्सूनपूर्व कपाशीची छोटी झाडे तयार झाली आहेत; परंतु पावसाअभावी कापसाचे हे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अकोला तालुक्यातील बोंदरखेड, पांढरी, सांगळूद, यावलखेड, चाचोंडी, अलियाबाद, बाभूळगाव, डोंगरगाव, सिसा, मासा, गुडधी आदी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी परवा पडलेल्या पावसामुळे पेरणीची तयारी केली, तर अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पेरणीही केली आहे. पांढरी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. जमिनीत ओलावाच नसून, अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन वरच पडले आहे. काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात मूग पिकाची पेरणी केली होती. त्या मुगाची वाढ खुंटली असून, आता मूग, उडीद पेरणीचे दिवस संपले आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन १५ जुलैपर्यंत पेरता येईल, तर कापूसही त्यानंतर काही दिवस पेरता येईल, त्यासाठी पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. काही तालुक्यांत काही गावांच्या शिवारात पाऊस पडल्याने तेथील पिकांना संजीवनी मिळाली; परंतु तेथील पिकांना पावसाचा ताण सहन करावा लागल्याने उत्पादन किती येणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.