अकोला जिल्ह्यात पावसाअभावी केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:07 AM2021-06-17T11:07:49+5:302021-06-17T11:07:55+5:30

Sowing in only 1.38 per cent in Akola District : अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे.

Sowing in only 1.38 per cent area due to lack of rains! | अकोला जिल्ह्यात पावसाअभावी केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी!

अकोला जिल्ह्यात पावसाअभावी केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी!

Next

अकोला : यंदा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले; परंतु बहुतांश तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी केली असून आता दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. आज ना उद्या पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाऊसच नसल्याने जमिनीत ओल मुरलेली नाही. यावर्षी जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अपेक्षित पेरणीही झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के म्हणजेच ६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अकोला, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यात अत्यल्प पेरणी

पावसाअभावी जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये अकोला ०.०४ टक्के, मूर्तिजापूर ०.०५ टक्के, बाळापूर ०.२ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पातूर सर्वाधिक ४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

 

जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पाऊस

मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ७७.० टक्के पाऊस झाला होता.

अकोट तालुक्यात सर्वात कमी पाऊस

मागील १५ दिवसांमध्ये झालेल्या पावसात अकोट तालुक्यात सर्वात कमी २७.३ मिमी नोंद झाली आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ८५.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पातूर तालुक्यात ८१.९ मिमी पाऊस झाला.

 

आतापर्यंत झालेला पाऊस

५०.३ मिमी

आतापर्यंत झालेल्या पेरणी

१.३८ टक्के

पेरणीची घाई नको!

इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडत आहे; परंतु अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात झाली नाही. सध्या पेरणीसाठी लगबग सुरू असून शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.

 

यंदा कपाशी पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी रखडली आहे. अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- किशोर मोरे, शेतकरी

Web Title: Sowing in only 1.38 per cent area due to lack of rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.