वऱ्हाडात केवळ ५० टक्के क्षेत्रावर पेरणी!
By Admin | Published: July 5, 2017 01:40 AM2017-07-05T01:40:54+5:302017-07-05T01:40:54+5:30
अकोला, अमरावती जिल्ह्यांतील पेरण्या खोळंबल्या : शेतकऱ्यांना सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाने दडी मारल्याने विदर्भातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पश्चिम विदर्भात १५ लाख १३ हजार ५०० हेक्टरवर (५० टक्के) पेरण्या झाल्या असून, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांतील पेरणीची टक्केवारी सर्वात कमी आहे. येत्या दोन, तीन दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना नियमित खरीप पिकांमध्ये फेरपालट करावी लागणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम शेत उत्पादनावर होत आहे. यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने पूरक पावसाचे भाकीत केले होते; पण त्याप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकरी मात्र सैरभैर झाला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला पावसाच्या अनिश्चिततेचा सातत्याने सामना करावा लागत आहे. तो यावर्षीही समोर आहे. अशी सर्वच बाजूंनी संकटे असताना शेतकऱ्यांनी यावर्षी कृषी निविष्ठांची खरेदी केली; पण आभाळाकडे बघण्यावाचून त्यांच्यासमोर सध्या दुसरा पर्याय नसल्याचे चित्र आहे.
पाच जिल्ह्यांतील ३२ लाख ७५ हजार हेक्टरपैकी तीन दिवसांपूर्वी ४८ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात केवळ १३ टक्के तर अकोला जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्याच्या ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २० हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ३० हजार ३०० हेक्टर (५७ टक्के), वाशिम जिल्ह्यात २ लाख ८६ हजार ६०० हेक्टर (६९ टक्के) तर यवतमाळ जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ३०० हेक्टरवर (७० टक्के) पेरणी झाली आहे.
पेरणी झालेले पीक
पाच जिल्ह्यात कापूस ५ लाख २६ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन ७ लाख ५ हजार ७०० हेक्टर, तूर २ लाख ५ हजार ७०० हेक्टर, मूग ४१ हजार, उडीद ४६ हजार तर ज्वारी १,९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावर्षी कृषी विभागाने खरीप हंगाम पेरणीचे नियोजन करताना मूग व उडीद या पिकात वाढ केली होती; परंतु एक महिना होऊनही सार्वत्रिक पाऊस नसल्याने मूग, उडिदाच्या क्षेत्रात घसरण झाली आहे.