...आता करावी लागणार अर्ध रब्बी पिकांंची पेरणी!
By admin | Published: July 11, 2017 02:15 AM2017-07-11T02:15:21+5:302017-07-11T02:15:21+5:30
कृषी विद्यापीठाचे नियोजन तयार
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षी खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीची वेळ संपली आहे. दीड महिन्यांपासून सार्वत्रिक पाऊस नसल्याने आता अर्ध रब्बी पिकांची पेरणी करावी लागणार आहे. विदर्भासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीचे नवे पीक नियोजन तयार केले आहे. आणखी हीच परिस्थिती आठ दिवस राहिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना तूर व सूर्यफूल पिकांचा अर्ध रब्बी पेरणीसाठी पर्याय निवडावा लागणार आहे.
विदर्भातील कोरडवाहू पिकाखाली ९० टक्के क्षेत्र असून, पिकांची उत्पादन क्षमता ही वेळेवर व नियमित पावसावरच अवलंबूून आहे. अलीकडच्या तीन-चार वर्षांच्या काळात पावसाच्या अनियमिततेच्या समस्या वारंवार उद्भवत असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी एक महिन्यापासून विदर्भात सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्याने अंकुरलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत.
यावर्षी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला, तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांना नव्याने पीक पेरणीत बदल करावे लागणार आहेत. त्या अनुुषंगाने या कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. पावसाचे भाकीत, वेगवेगळे अंदाज पुन्हा वर्तविण्यात येत असले, तरी या अंदाजावर कितपत निर्भर राहायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाने आता आपत्कालीन सोबतच अर्ध रब्बी पिकांचे नियोजन केले आहे.
नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त १६ ते २२ जुलैपर्यंत उशिरा सुरू होत असेल, तर पेरणी करताना २० ते २५ टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा लागेल. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करू न सुधारित वाणांचा अधिक प्रमाणात वापर करावा लागणार आहे.
मूग, उडीद या पिकांची पेरणी अजिबात करू नये, २३ ते २९ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी शक्यतो करू नये, केल्यास २५ ते ३० टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे, सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. ज्वारी पिकाबाबत याच पद्धतीने नियोजन करावे लागेल. पूर्व विदर्भात ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यास, धान पिकाची पेरणी सलग दोन दिवस करावी, धान पिकाच्या लवकर येणाऱ्या व मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी १५ जुलैपर्यंत रोपवाटिकेत करावी.
पावसाळ््याच्या सुरुवातीचे दोन महिने हे अंत्यत महत्वाचे असून, या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच शेतीचे भवितव्य अवलंबूून असते. यावर्षी थोडा पावसाळा लांबल्याने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. या परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखात बदल, पावसाच्या पडणाऱ्या कालावधीनुसार पिकांची निवड, मशागत करावी लागते. या दोन-तीन दिवसांत पावसाची अपेक्षा आहे. पाऊस आणखी लांबल्यास अर्ध रब्बी पिकांचा पर्याय निवडावा लागेल.
- डॉ. दिलीप एम. मानकर,
संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.