पेरले सोयाबीन; विमा कापसाचा!

By admin | Published: September 26, 2016 03:21 AM2016-09-26T03:21:22+5:302016-09-26T03:21:22+5:30

बँकांनी घोळ घातल्याचा शेतक-यांचा आरोप.

Sown soybean; Cotton of insurance! | पेरले सोयाबीन; विमा कापसाचा!

पेरले सोयाबीन; विमा कापसाचा!

Next

अकोला, दि. २५- जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी खरीप पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी पीक विमा काढला. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनचा अनेक शेतकर्‍यांनी विमा काढला; परंतु काही बँकांनी परस्पर सोयाबीनऐवजी कापसाचा विमा उतरविला. यामुळे अनेक शेतकर्‍यांवर सोयाबीनच्या विम्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.
खरीप हंगामातील पिकांना संरक्षण देण्यासाठी यावर्षी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी विमा योजनेत जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. यामुळे १ लाख ६९ हजार ६0४ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले असून, विम्याच्या हप्त्यापोटी (प्रीमियम) शेतकर्‍यांनी १८ कोटी ७५ लाख ३५ हजार रुपयांचा भरणा केला आहे.
गत दोन वर्षांच्या कालावधीत पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात घट येत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पीक हातचे गेल्याने होणार्‍या संभाव्य नुकसानाची जोखीम करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजना सुरू केली आहे. योजनेत सहभागी शेतकर्‍यांना पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम मिळते. यामुळे जिल्हय़ातील अनेक शेतकरी कृषी विमा काढण्यास प्राधान्य देत आहेत. शेतकर्‍यांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळे यावर्षी या योजनेला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. दरम्यान, जिल्हय़ातील कर्जदार शेतकर्‍यांकडून पेरेपत्रक न भरता संबंधित बँकांनी सोयाबीन पिकाऐवजी परस्पर कापसाचा पीक विमा काढल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. चुकीच्या पिकांची नोंद केल्यामुळे नुकसान भरपाई मिळणार का, असा प्रश्न या शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

कर्जदार शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरले; पण त्यांच्याकडून पेरेपत्रक न भरता बँकांनी परस्पर कापसाचा विमा काढला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत आहोत.
-संतोष राऊत, शेतकरी, निपाणा, (बोरगाव मंजू) अकोला.

Web Title: Sown soybean; Cotton of insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.