बाजारात सोयाबीनची आवक वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:44 PM2019-11-13T13:44:56+5:302019-11-13T13:45:03+5:30
मंगळवारी सोयाबीनची आवक ही ५ हजार ९५१ क्विंटल एवढी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सोयाबीनची आवक सरासरी ६ हजार क्विंटलपर्यंत वाढली असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत प्रतिक्विंटल कमीत कमी ३,१०० ते सरासरी ३,६०० रुपये दर दिले जात आहेत.
परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, सोयाबीनचेही नुकसान झाले असून, प्रत खराब झाली आहे. अकोल्याच्या बाजार समितीमध्ये चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ३,८०० रुपये दर दिले जात आहे. मंगळवारी सोयाबीनची आवक ही ५ हजार ९५१ क्विंटल एवढी होती.
मुगाचे हमीदर यावर्षी प्रतिक्विंटल ७५ तर उडिदाचे दर १०० रुपयांनी वाढविण्यात आले. मागील वर्षी मुगाला प्रतिक्विंटल ६,९७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आले होते. यावर्षी हे दर ७ हजार ५० रुपये करण्यात आले आहेत. उडिदाचे हमीदर मागील वर्षी ५,६०० रुपये होेते, ते यावर्षी ५,७०० रुपये आहेत. मुगाच्या दरात ७५ तर उडिदाच्या हमीदरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली. असे असले तरी आजमितीस मुगाला बाजारात प्रतिक्विंटल ४,६०० ते सरासरी ५,८०० रुपयेच दर आहेत. या हमीपेक्षा हे दर कमी आहेत. उडिदाचे दरही प्रतिक्विंटल ४ हजार ते सरासरी ५ हजार २०० रुपये आहेत. हे दरही बाजारात कमी आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात मूग विकणे पसंत केले आहे. आता मूग, उडिदाची आवक घटली असून, अकोला बाजार समितीमध्ये मंगळवारी मूग ४३ व उडीद ९१ क्विंटल आवक झाली. सरासरी ही आवक असून, यावर्षी मूग, उडीद पिकाचेही खूप नुकसान झाल्याने आवक घटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हरभºयाची आवकही जवळपास २३१ क्विंटल असून, प्रतिक्विंटल कमीत कमी ३,७००, सरासरी ३,३५० रुपये आहेत. तुरीची आवक १२ क्विंटल होती. तुरीचे प्रतिक्विंटल कमीत कमी ४,८०० ते सरासरी ५,३०० रुपये आहेत. लोकल ज्वारीची आवक दररोज सरासरी ३३० क्विंटल असून, मंगळवारी ३३३ क्विंटल आवक होती. अकोला बाजार समितीमध्ये या ज्वारीला कमीत कमी प्रतिक्विंटल १,३०० रुपये तर सरासरी १,६५० रुपये दर आहेत. शरबती गव्हाचे सरासरी प्रतिक्विंटल दर २,७५० रुपये आहेत. आवक २५ क्विंटल आहे. लोकल गव्हाची आवक ३५ क्विंटल असून, प्रतिक्विंटल सरासरी दर २,१०० रुपये आहेत.