सोयाबीन आणि पामतेलाचे दर वाढले; गृहिणींचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 11:04 AM2021-08-02T11:04:14+5:302021-08-02T11:04:20+5:30
Soybean and palm oil prices rise : मागील वर्षभरापासून सुरू झालेली दरवाढ कायम आहे.
अकोला : गत काही महिन्यांपासून तेलांच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून जात असून मागील वर्षभरापासून सुरू झालेली दरवाढ कायम आहे. यातच फोडणीसोबतच देवासमोरील दिव्याचे तेलही महागले आहे.
यंदा सर्वच तेलांचे भाव तेजीत आहेत. यामध्ये पॅकिंगचे तेल तसेच भुसार व ऑइल भांडार येथील तेलाच्या भावात काहीसा फरक असला तरी आता हे दर वधारलेलेच आहेत. यापूर्वी फोडणीसाठी लागणाऱ्या सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ या तेलासोबतच देवासमोर दिवा लावण्यासाठी वापरले जाणारे तेलही महाग झाले आहे. तेलाच्या दरात १० ते २० रुपयांचा फरक पडला आहे.
कारण काय?
जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. यासह अन्य तेलवर्गीय बियाण्यांचेही उत्पादन घेतले जाते. दोन वर्षांपासून इंधन व कच्च्या तेलाचे भाव वाढले.
यासोबत रिफायनरी तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. शहरात इतर जिल्ह्यातून व परराज्यातून पॅकिंग तेलाची आवक होते. काही महिन्यांपासून इंधनाचे दर वाढत आहेत.
याचा परिणाम तेलाच्या दरावरही होत आहे. स्थानिक बाजारपेठेत तेल भांडारमध्ये मिळणारे तेल या पॅकिंगच्या तुलनेत थोडे स्वस्त मिळत असल्याचे दिसून येते.
पोटपूजेसोबतच देवपूजाही महागली!
तेलाच्या दरात सातत्याने होणारी वाढ महिन्याचे आर्थिक बजेट बिघडवणारी आहे. यामुळे घरखर्च भागविण्यात अडचणी येत आहे. पैशाची आवक कमी खर्च जास्त आहे. खाद्यतेलाचे भावही वाढल्याने फोडणीसह देवासमोर लावण्यात येणाऱ्या दिव्याचाही कमी वापर झाला आहे.
- निधी राऊत
गत दोन वर्षांपासून दिवसेंदिवस तेलाचे भाव वाढत आहेत. ९० ते ९८ रुपये मिळणारे सोयाबीनचे तेल तब्बल दीडशे रुपये किलोवर पोहोचले आहेत. दिवसातून तीन वेळा होणाऱ्या फोडणीला ब्रेक बसला असून आता दोन फोडणीच होत आहेत.
- रिया देशमुख