सोयाबीनचे पीक करपले !

By admin | Published: September 14, 2016 02:02 AM2016-09-14T02:02:18+5:302016-09-14T02:02:18+5:30

अकोला जिल्हय़ातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर फेरले पाणी.

Soybean Crop! | सोयाबीनचे पीक करपले !

सोयाबीनचे पीक करपले !

Next

अकोला, दि. १३ : पाच आठवडे झाले पावसाने दडी मारल्याने जिल्हय़ातील सोयाबीनचे पीक करपले असून, सतत पाच वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर यावर्षी पाणी फिरले आहे. सोयाबीनच्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारली आहे. त्याचा परिणाम शेंगावर झाला आहे.
खरीप हंगामातील पिके परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाच पावसाने प्रदीर्घ दडी मारली. पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, खरबळ जमिनीतील सोयाबीन नष्ट झाले असून, काळ्य़ा भारी जमिनीतील सोयाबीन शेवटच्या घटका मोजत आहे.
पाऊस नसल्याचे सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरले नाही. त्यामुळे शेंगाचे दाणे पोचट आहेत. यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जुलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली; पण ऐन पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत आहे.
पश्‍चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडेचौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक ७0 टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतकर्‍यांनी १0 जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे.
शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी झाला आहे.
हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम झाला असून, भारी, काळ्य़ा जमिनीतील शेंगांवर आता दुष्परिणाम होत आहे. मागील तीन, चार वर्षानंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आनंदित आहे; पण पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे.
मान्सूनपूर्व बीटी कापसाने बोंड्या धरल्या असून, इतरही बीटी कापसाला फुले आली आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; पण पाण्याचा ताण सहन करण्यापलीकडे या पिकाची क्षमता संपली आहे. शेतकर्‍यांना आता पाऊस हवा असल्याने शेतकर्‍यांचे डोळे पुन्हा नभाकडे लागले आहेत.

Web Title: Soybean Crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.