सोयाबीन पिकाला शेंगाच नाहीत; शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:22 AM2021-09-12T04:22:58+5:302021-09-12T04:22:58+5:30
खिरपुरी : परिसरात यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली असून, खिरपुरी बु. शिवारात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र, गत महिन्यात ...
खिरपुरी : परिसरात यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली असून, खिरपुरी बु. शिवारात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र, गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनची फूलगळ झाल्याने, तसेच चक्रीभूंगा, खोडकीड, आदी रोगांचे आक्रमणाने सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, या भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. गेल्या मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उडीद, मुगाचे हातातोंडाशी आलेले पीक गेले, तर कपाशी पिकावर लाल्या, कोकडा या रोगराईमुळे कपाशीची वाढच झाली नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
जुलै महिन्यात परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते, तर गावात घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. ही अतिवृष्टी सोयाबीन फुलावर असताना झाली, तसेच काही भागात संततधार पावसामुळे सोयाबीनला फुलोरा लागलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होणार नसल्याचे चित्र आहे.
------------------------------
मी माझ्या शेतामध्ये सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीनची पेरणी करून ७० दिवस उलटूनही फुले व शेंगा लागल्या नाहीत. कृषी विभाग व पीक विमा कंपनींनी सर्व्हे करून आर्थिक मदत करावी.
- प्रवीण दांदळे, शेतकरी, खिरपुरी बु.
-------------------------------
कपाशीची वाढ खुंटली!
बाळापूर तालुक्यात कपाशीचा पेरा कमी आहे. खिरपूरी बु. परिसरात काही शेतकऱ्यांनी कपाशीला पसंती देऊन पेरणी केली. मात्र, संततधार पावसामुळे कपाशीवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. तसेच कपाशीची वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.