वाडी अदमपूर येथे सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:48+5:302021-09-04T04:23:48+5:30
तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत ...
तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील वाडी अदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे यांचे वाडी अहमदपूर शेतशिवारात १ हेक्टर ९६ आर शेती आहे. त्यासाठी त्यांनी तेल्हारा येथील एका कृषी केंद्रातून दि.४ जून २०२१ रोजी पाच बॅग बियाणे खरेदी केले. पेरणीनंतर त्यांनी शेताचे निरीक्षण केले असता एक बॅग ज्या शेतात पेरली तिला शेंगांची संख्या भरपूर आहे. मात्र, चार बॅग बोगस असल्याने शेंगाच नसल्याचा आरोप शेतकऱ्याने तक्रारीतून केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. त्यांनी अर्जाच्या प्रतिलिपी तालुका कृषी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांच्याकडे दिल्या आहेत.
-----------
तक्रारीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पिकाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल.
-भरत चव्हाण, गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा