हमीभाव केंद्रांकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 11:33 AM2020-11-17T11:33:23+5:302020-11-17T11:33:43+5:30
Akola agriculture News जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर अद्याप सोयाबीनची आवक नाही.
अकोला: आधारभूत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली; मात्र हमी दरापेक्षा बाजारात सोयाबीनला जादा दर मिळत असल्याने, जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर अद्याप सोयाबीनची आवक नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे वास्तव आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत ३ हजार ८८० रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. हमी दराने सोयाबीन खरेदीसाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत तीन आणि विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत तीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली; मात्र हमीभावाच्या तुलनेत बाजारात सोयाबीनला जादा दर मिळत असल्याने, जिल्ह्यातील सहा हमीभाव केंद्रांवर अद्यापही सोयाबीनची
आवकच नाही. त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांकडे पाठ फिरवित बाजारात सोयाबीन विकण्याकडे कल वाढविल्याचे वास्तव आहे.
असे आहेत हमीभाव केंद्र!
जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत पारस, बाळापूर व पातूर इत्यादी तीन ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत। तसेच विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत अकोला, अकोट व मूर्तिजापूर इत्यादी तीन ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
सोयाबीनचे असे आहेत हमीभाव, बाजार भाव!
हमीभाव केंद्रांवर सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ८८० रुपये तर बाजारात प्रति क्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार ५०० रुपये सोयाबीनला भाव मिळत आहे.