सोयाबीन तेल १२२, शेंगदाणा १५५ रुपये किलो; गरिबांना महागाईचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:03+5:302020-12-25T04:16:03+5:30
अकाेला :बाजारात सर्वाधिक विकल्या जाणारे सोयाबीन तेल दोन महिन्यांपासून किरकोळमध्ये प्रति किलो २० ते २२ रुपयांनी वाढून १२२, तर ...
अकाेला :बाजारात सर्वाधिक विकल्या जाणारे सोयाबीन तेल दोन महिन्यांपासून किरकोळमध्ये प्रति किलो २० ते २२ रुपयांनी वाढून १२२, तर शेंगदाणा तेल १५५ रुपयांवर पोहोचले आहे. या दरवाढीने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत असून, दरवाढीवर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील दाेन महिन्यांच्या कालावधीत खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. यामध्ये सर्वच तेलांच्या किमती २० ते २५ रुपये किलोने वाढल्या आहेत. किमती आणखी किती वाढतील, असे सांगणे कठीण असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे मत आहे. गेल्या दोन महिन्यांत सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो २२ रुपये, तर सूर्यफूल तेल २० रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे सोयाबीनला जास्त भाव मिळत नसताना तेलाचे भाव का वाढत आहेत, अशी ओरड सुरू आहे. १०० किलो सोयाबीनपासून १७ ते २२ किलो तेल निघते आणि उर्वरित ढेप तयार होते, पण यंदा ढेपेला देश-विदेशांत मागणी नाही. त्यामुळे एक क्विंटल सोयाबीनला चार हजारांच्या आसपास भाव मिळत आहेत. विदर्भात साेयाबीन तेलाच्या विक्रीचे प्रमाण ८० टक्के आहे. उर्वरित टक्केवारीत इतर सर्व तेलांचा समावेश आहे. सोयाबीनचे दर वाढल्याने सर्वच क्षेत्रातून ओरड सुरू झाली आहे.
सोयाबीन उत्पादनाला फटका
चालू वर्षात कमी आलेले सोयाबीनचे पीक, आयात व निर्यातीत तफावत आणि जागतिक बाजारात चीनकडून होणारी भरमसाट खरेदी ही दरवाढीची मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. भारतात केंद्र सरकारने पामतेलावर १० टक्के आयात शुल्क कमी केले, पण मलेशियाने नियार्तीवर ८ टक्के निर्यात शुल्क वाढविल्याने देशात आयात महाग झाली आहे. त्याचा फटका पामतेल व पर्यायाने साेयाबीन तेलाला बसला आहे.
गेल्या काही दिवसांत सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गृहिणींना स्वयंपाकातील वापरात काटकसर करावी लागत आहे.
दर कमी हाेतील, ही अपेक्षा आहे. -शैलजा प्रमाेद वडतकार
पामतेलावर आकारल्या जाणाऱ्या ड्युटीत मार्च महिन्यांपासून सतत वाढ झाल्याचा परिणाम सर्वच तेलाच्या भाववाढीवर झाला आहे. पुरवठा कमी अन् मागणी जास्त असल्याने आगामी दिवसांत आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.
-श्रीकांत लव्हाळे, किराणा व्यावसायिक, अकाेला
; ! ? () -