सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे १२ रुपयांनी घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 03:27 PM2020-02-28T15:27:24+5:302020-02-28T15:27:30+5:30
भविष्यात सोयाबीन तेलाचे भाव यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
- संजय खांडेकर
अकोला : गत आठवडाभरात सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे १२ रुपयांनी घसरले आहेत. यामुळे अनेक व्यापारी-उद्योजकांना आर्थिक फटका बसला असला तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. चीनने अंतर्गत परिस्थितीमुळे सोयाबीनच्या तेलाची खरेदी नाकाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेल साठा भारतात मोठ्या प्रमाणात वळल्याने तेलाचे भाव पडले आहे. मागील आठवड्यात ९७ रुपये किलो विक्री होत असलेले सोयाबीन तेल आता ८५ रुपये किलोच्या दरावर स्थिरावले आहे. भविष्यात सोयाबीन तेलाचे भाव यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
भारत आणि चीन या दोन देशात सोयाबीन तेलाची मोठी मागणी सातत्याने असते. भारतातील ७० टक्के तेल विदेशातून आयात होते. केवळ ३० टक्केच तेलाची निर्मिती देशाअंतर्गत होते. सोयाबीन आणि पाम तेल इतर तेलांच्या तुलनेत स्वस्त असल्याने गोरगरीब जनतेतून त्याला जास्त मागणी असते. दरम्यान, यंदा तेलबिया वाण असलेल्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने दिवाळीपासून सोयाबीन तेलाचे भाव सातत्याने वधारत गेले. दिवाळीपूर्वी ७८ रुपये किलो विकल्या जाणाऱ्या तेलाचे भाव काही महिन्यातच १०४ रुपये किलोपर्यंत पोहोचले. ते मागील आठवड्यात ९७ रुपयांवर आले. दरम्यान, चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला. त्यामुळे चीनने यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून येणाºया सोयाबीन तेलाची खरेदी नाकारली. भारत आणि चीन या दोघांकडूनच तेलास मागणी असते. त्यात चीनने सोयाबीन तेलाची खरेदी नाकारल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाची मोठी आयात भारताकडे आपसूकच आली आहे. त्यामुळे तेलाचे भाव कोसळले आहे.
या देशातून होतो पुरवठा
*भारताला ७० टक्के तेल आयात करणाºया देशामध्ये अमेरिका, अर्जेंटिना, युक्रेन, इंडोनेशिया, मलेशिया यांचा समावेश आहे. या देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे तेल दरवर्षी येते. चीनने खरेदीस नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता सोयाबीन तेल खरेदीदार म्हणून भारत एकमेव देश उरला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल भारतात आयात होत असल्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव पडले. भविष्यात याहीपेक्षा खाली भाव कोसळण्याचे संकेत मिळत आहे.