पश्चिम विदर्भात सोयाबीनला प्राधान्य ; कपाशीची ९८ टक्के पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:05+5:302021-07-25T04:17:05+5:30

अकोला : यावर्षी सोयाबीन बियाणांची झालेली दरवाढ व महाबीजकडून कमी पुरवठा या कारणांमुळे लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता होती ...

Soybean preference in West Vidarbha; 98% sowing of cotton! | पश्चिम विदर्भात सोयाबीनला प्राधान्य ; कपाशीची ९८ टक्के पेरणी !

पश्चिम विदर्भात सोयाबीनला प्राधान्य ; कपाशीची ९८ टक्के पेरणी !

Next

अकोला : यावर्षी सोयाबीन बियाणांची झालेली दरवाढ व महाबीजकडून कमी पुरवठा या कारणांमुळे लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता होती ; परंतु याउलट यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. आतापर्यंत पश्चिम विदर्भात सोयाबीनची १३ लाख ९९ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली तर ९८ टक्के क्षेत्रात कपाशीची लागवड झाली आहे. या हंगामातही शेतकऱ्यांकडून सोयाबीनवर जास्त जोर असल्याचे दिसून येते. यंदाच्या खरीप हंगामात निसर्गासोबत प्रशासनानेही शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाल्याने बियाणांच्या उगवणशक्तीवर परिणाम झाला. त्यामुळे महाबीज अपेक्षित सोयाबीन बियाणे पुरवठा करू शकले नाही. खासगी कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात दरवाढ केली. एका बॅगची किंमत ३२००-३५०० रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता ; मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बियाणे विकत घेतले, काही जणांकडे घरचे साठवून ठेवलेले बियाणे उपलब्ध होते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात सोयाबीन लागवड झाली आहे. आतापर्यंत सोयाबीन ९३.४ तर कपाशी ९८.९ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे.

९२.४ टक्के क्षेत्रात पेरणी

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पश्चिम वऱ्हाडातील रखडलेल्या पेरणी जवळपास आटोपल्या आहे. आतापर्यंत २९ लाख ८४ हजार ५७१ हेक्टर म्हणजेच ९२.४ टक्के क्षेत्रात पेरणी झाल्या आहे. गतवर्षी याच वेळेस ९२ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या.

मका लागवडीचे क्षेत्र वाढले !

यंदा पश्चिम विदर्भात ३१ हजार १५३ हेक्टरमध्ये मका लागवडीचे नियोजन होते ; परंतु मका लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. आतापर्यंत ३७ हजार ३७३ हेक्टरमध्ये म्हणजेच १२० टक्के मका लागवड झाली आहे.

कडधान्य ८८.४ हेक्टरमध्ये

आतापर्यंत अमरावती विभागात तुरीच्या क्षेत्रात किंचित वाढ झाली. आतापर्यंत सरासरी ४ लाख ३२ हजार हेक्टरपैकी ४ लाख ८८ हजार हेक्टरमध्ये म्हणजेच ९४.५ टक्के क्षेत्रात तुरीची लागवड झाली आहे. उडिदाच्या सरासरी ६४ हजार हेक्टरपैकी ४६ हजार ७९७ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे. मुगाची ६२ हजार ४०९ हेक्टरवर लागवड झाली.

पिकांचे लागवडीखालील क्षेत्र (टक्क्यांमध्ये)

कपाशी ९८

सोयाबीन ९३.४

तूर ९४.५

उडीद ७२.८

मूग ७४.१

Web Title: Soybean preference in West Vidarbha; 98% sowing of cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.