सोयाबीनचे भाव पडलेलेच !

By admin | Published: December 31, 2014 12:52 AM2014-12-31T00:52:02+5:302014-12-31T00:52:02+5:30

सोयाबीनचा हमीदर २५६0 रुपयांवर स्थिर.

Soybean prices fall! | सोयाबीनचे भाव पडलेलेच !

सोयाबीनचे भाव पडलेलेच !

Next

अकोला : सतत दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांच्या हाती निराशा आली असून, बाजारातील किमती आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले. या परिस्थितीत हमीभाव तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी वाढ झाली नसून, बाजारात सोयाबीनचे भाव अद्याप वाढले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले. यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला आहे. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने यावर्षी बियाण्यांसाठी शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागला. बियाणे मिळाले; परंतु हजारो हेक्टरवरील बियाणे वांझ निघाल्याने शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. कीटकनाशके फवारण्याचा अतिरिक्त खर्च वाढला. त्या तुलनेत उत्पादन झाले नाही. उत्पादनखर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना खासगी बाजारात सोयाबीनचे प्रतिक्विंटल भाव २५00 ते ३000 च्या वर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन परिपक्वतेपूर्वीच वाळले. त्यामुळे शेंगांची वाढ खुंटली होती. हाच धागा धरू न शेतकर्‍यांच्या सोयाबीनची बाजारात लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. सतत दोन वर्षांच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकर्‍यांनी शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारातच आणले. हमीभावाने मात्र शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले.
गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे प्रतिक्विंटल हमीदर २५६0 रुपयांवर स्थिरावले आहेत. त्याचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. हमीभाव कमी असल्यामुळे व्यापारीही कमी भावातच सोयाबिनची खरेदी करीत आहे. परिणामी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Soybean prices fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.