सोयाबीनचे दर पाच हजारांवर; शेतकरी म्हणतात, आता काय करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:20 AM2021-09-26T04:20:52+5:302021-09-26T04:20:52+5:30

अकोला : सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने अनेक जिल्ह्यांत सोयाबीनचा पेरा वाढला. मात्र, आता सोयाबीनचे दर कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता ...

Soybean prices at five thousand; Farmers say, what to do now! | सोयाबीनचे दर पाच हजारांवर; शेतकरी म्हणतात, आता काय करू!

सोयाबीनचे दर पाच हजारांवर; शेतकरी म्हणतात, आता काय करू!

Next

अकोला : सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने अनेक जिल्ह्यांत सोयाबीनचा पेरा वाढला. मात्र, आता सोयाबीनचे दर कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला ५८५० रुपये प्रती क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला.

मागील हंगामाच्या शेवटी सोयाबीनला चांगला दर मिळाला. उन्हाळ्यात शेतकऱ्यांजवळ सोयाबीन नसताना दर १० हजारांवर गेले होते. आता बाजार समितीत नवीन सोयाबीन येण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीनच्या मुहूर्ताच्या खरेदीला चांगला दर मिळाला. परंतु, आता दर ५ हजारांपर्यंत आले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालात आर्द्रता जास्त असल्याने ३ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सोयाबीनचे दर (प्रती क्विंटल)

जानेवारी २०२० - ३७८१

जून २०२० - २९००

ऑक्टोबर २०२० - ३३००

जानेवारी २०२१ - ४२५०

जून २०२१ - ७५००

सप्टेंबर २०२१ - ६५००

सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये)

२०१८ - १४६६८३

२०१९ - १५२२८२

२०२० - १७०८५८

२०२१ - २३०२५५

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?

गत हंगामात शेवटी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढले आहे. आता दरात घसरण होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न पडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते व कीटकनाशके विकत घेतली होती.

- संतोष ताले, शेतकरी, माझोड

यंदा सोयाबीन चांगले बहरले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, काही दिवसांपासून सतत दर कोसळत आहे. त्यामुळे काढणीपर्यंत दर किती राहणार, याची चिंता लागली आहे. तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही यंदा चांगला दर मिळेल या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली आहे.

- मनोहर शेगोकार, शेतकरी, सोनाळा

व्यापारी म्हणतात...

सध्या पाऊस सुरू असल्याने बाजारात आवक कमी आहे. बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये २० टक्केपर्यंत आर्द्रता आहे. आता दर मागे येण्याची शक्यता कमी असून, वाढीची शक्यता आहे. सध्या ५ ते ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे.

- अनिल पेढीवाल, व्यापारी

बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला सोयाबीनला चांगला दर मिळाला. परंतु, आता ५ ते ६ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळतोय. ऑक्टोबर महिन्यात ४ ते ५ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत दर राहण्याची शक्यता आहे.

- चंद्रशेखर पाटील, व्यापारी

Web Title: Soybean prices at five thousand; Farmers say, what to do now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.