हंगाम संपल्यानंतर सोयाबीनचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:38+5:302021-03-15T04:17:38+5:30
वऱ्हाडात सोयाबीन हे पीक प्रामुख्याने घेण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख हेक्टरवर पेरणी केली. हे सोयाबीन अति पावसाने ...
वऱ्हाडात सोयाबीन हे पीक प्रामुख्याने घेण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख हेक्टरवर पेरणी केली. हे सोयाबीन अति पावसाने बहुतांश भागात खराब झाले. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. थोडेफार वाचलेले सोयाबीन बाजारात आणले. खुल्या बाजारातही तीन हजार रुपये दराने सोयाबीन विकावे लागले. जिल्ह्यातील बाजार समितीतही दरात घट पाहायला मिळाली. मालाचा दर्जा निकृष्ट असल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी दराने सोयाबीन विकले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अकोला बाजार समितीत सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. अकोला बाजार समितीत दैनंदिन सोयाबीनची अडीच हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी होत आहे. कमीत कमी ४८०० तर जास्तीत जास्त ५२७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. ऐन हंगाम संपल्यानंतर हा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. आता काहीच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. तर काहींनी खरीप हंगामाच्या बियाण्यांसाठी साठवून ठेवले आहे. घरात शेतमाल असताना भाव गडगडतात, तर शेतमाल विकल्यानंतर भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे न सुटणारे कोडे बनले आहे.
--बॉक्स--
बाजार समितीत भाव
कमीत कमी ४८०० रुपये
जास्तीत जास्त ५२७५ रुपये
शनिवारी झालेली आवक
२६७९ क्विंटल
--कोट--
खरिपात सोयाबीनचे पीक खराब झाले. उताराही कमी आला. लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. आता सोयाबीनचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटत आहे.
-गौरव घोगरे, शेतकरी, टाकळी