१७ एकरांतील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:13 AM2021-07-03T04:13:39+5:302021-07-03T04:13:39+5:30
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी संकटात सापडला होता; मात्र यावर्षी तरी हा प्रकार होणार नसल्याची ...
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी संकटात सापडला होता; मात्र यावर्षी तरी हा प्रकार होणार नसल्याची शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्याकरिता यंदा शेतकऱ्यांनी महागड्या सोयाबीन बियाण्यांची खरेदी करून पेरणी केली; परंतु सोयाबीन बियाणे उगवणशक्तीचे प्रकार शेतकऱ्यांची पाठ सोडणार नसल्याचे दिसते. दिग्रस बु. येथील शेतकरी गोपाल त्र्यंबक गवई यांनी सस्ती येथील कृषी सेवा केंद्रातून सोयाबीन बियाण्यांच्या बॅग विकत घेतल्या. त्यांनी दिग्रस खुर्द येथील गट क्रमांक २०१, २०२, १३८, ३२ मध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली. त्याच दिवशी या पेरणी झालेल्या शेतात पाऊस पडला. पाठोपाठ दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. त्यानंतर गोपाल गवई हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता शेतामध्ये बियाणे उगवले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकरी गवई यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना फोनवरून माहिती दिली. यावेळी सोयाबीन उगवले नसल्याचे सांगितले. त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व बियाणे उगवले नसल्याची माहिती दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी शेतात येऊन पाहणी करतो, असे सांगितले. तसेच तुम्ही कोठेही तक्रार देऊ नका, असेही म्हणाले. तीन-चार दिवस होऊनसुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाले नसल्याने शेवटी १ जूनला पुन्हा संपर्क साधला; मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही. या प्रकारामुळे गवई यांना फसवणूक झाल्याचे कळले. त्यामुळे या प्रकरणी शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार दिली आहे.
पेरणीसाठी १ लाख २८ हजारांचा खर्च
शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवरच अवलंबून आहे. आतापर्यंत शेतकऱ्याला बियाणे, खत खरेदी, पेरणीपासून सर्व खर्च १ लाख २८ हजार रुपये झाला. हा सर्व खर्च वाया गेला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
शेजारच्या शेतातील बियाणे उगवले!
दिग्रस खु. शिवारातील शेतात शेतकरी गवई यांनी पेरणी केली. त्याच दिवशी त्यांच्या शेजारील शेतकऱ्यानेसुद्धा सोयाबीनची पेरणी केली; परंतु त्या शेतकऱ्याने वेगळ्या कंपनीच्या बियाण्यांची लागवड केली होती. ते बियाणे पूर्णपणे उगवल्याचे दिसत आहे.
१७ एकर क्षेत्रात सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली होती. यानंतर वेळोवेळी पाऊस झाला; परंतु बियाणे उगवले नाही. यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतात पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी.
- गोपाल गवई, शेतकरी, दिग्रस बु.
दिग्रस येथील शेतकऱ्यांची तक्रार मिळाली आहे. शनिवारी शेतकऱ्यांच्या शेतात कंपनीच्या प्रतिनिधीला बोलविले आहे. पाहणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- डी. एस. शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर