सोयाबीनचे बियाणे निघाले बोगस; शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:57+5:302021-07-19T04:13:57+5:30
बोरगाव मंजू येथील गोपाल पंडितराव देशमुख, प्रमोद शंकरराव शेवतकार, संतोष भीमराव देशमुख, दशरथ मोहोड या चार शेतकऱ्यांनी पिंजर पोलिसात ...
बोरगाव मंजू येथील गोपाल पंडितराव देशमुख, प्रमोद शंकरराव शेवतकार, संतोष भीमराव देशमुख, दशरथ मोहोड या चार शेतकऱ्यांनी पिंजर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, राहित येथील सुरेश राजाराम सपकाळ याने दिनांक २६ जून रोजी प्रतिबॅग २,७०० रुपये याप्रमाणे ३६ बॅग सोयाबीनचे बियाणे बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विकले. बोरगाव मंजू येथील चारही शेतकऱ्यांनी ३६ बॅगांपैकी २४ बॅगेतील बियाण्याची पेरणी केली. बियाणे बोगस असल्याने उगवलेच नाही. त्यामुळे बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांनी सुरेश राजाराम सपकाळ (रा. बार्शीटाकळी, हल्ली मुक्काम राहित) यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. सुरेश सपकाळ यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे चारही शेतकऱ्यांनी पिंजर पोलीस स्टेशन गाठत सुरेश राजाराम सपकाळ यांच्याविरूद्ध तक्रार दिली. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
--------------------
शेतकऱ्यांनी बियाणे नेले. मात्र, पावसाचा खंड पडल्याने किंवा जोराने पाऊस आल्याने बियाणे उगवले नसेल. बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांनी केलेला आरोप खोटा आहे.
- सुरेश राजाराम सपकाळ, (रा. बार्शीटाकळी, हमु. राहित)
-----------------------
बोरगाव मंजू येथील चार शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. कृषितज्ज्ञांचा सल्ला घेऊन चौकशी करणार आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
-महादेवराव पडघान, ठाणेदार, पोलीस स्टेशन पिंजर.