९८ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:06 AM2021-07-21T11:06:10+5:302021-07-21T11:06:55+5:30
Soybean sowing in 98% area : आतापर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
अकोला : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवला. सोयाबीन पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली; मात्र या स्थितीतही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत ९८ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली असून जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. काही दिवसांमध्ये जवळपास १० टक्के क्षेत्रात पेरणी झाली; परंतु पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. मध्यंतरी तुरळक पाऊस झाल्याने काही प्रमाणात पेरणी क्षेत्रात वाढ झाली; मात्र जुलै महिना उजाडला तरी पावसाची शक्यता दिसून येत नसल्याने दुबार पेरणीचे संकट घोंघावत होते. दरम्यान, ७ जुलैपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे हे संकट टळले. सततच्या पावसाने रखडलेल्या पेरण्यांनाही वेग आला. दरम्यान, सोयाबीन बियाण्यांचा मोठा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे यंदा पेरणी कमी होण्याची शक्यता होती; मात्र शेतकऱ्यांनी महागडे बियाणे विकत घेत पेरणी केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण पेरणी आटोपण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यात ९१.३६ टक्के क्षेत्रातील पेरण्या आटोपल्या!
मध्यंतरी काही दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतित होते. पाऊस पडण्याची प्रतीक्षा लागली होती; मात्र उशिरा का होईना, जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९१.३६ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.
मूग ९४ तर तूर ९५ टक्के पेरणी
दरवर्षी खरीप हंगामात सरासरी ३३६ हेक्टर क्षेत्रात पेरणी होते; परंतु यंदा ३७६ क्षेत्रात मका पिकाची पेरणी झाली आहे. तर मूग ९४ टक्के व तूर ९५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. उशिरापर्यंत पावसाचे आगमन न झाल्याने या पिकांना धोका निर्माण झाला होता.
सरासरी क्षेत्र
४,८३,२९१ हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र
४,४१,५२१ हेक्टर
पेरणी टक्क्यात
९१.३६ टक्के
मूर्तिजापूर, पातूर तालुक्यात कपाशीचा पेरा कमी!
जिल्ह्यात ८४ टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे. काही तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पेरणी झालेली आहे; परंतु मूर्तिजापूर व पातूर तालुक्यात कपाशीची पेरणी कमी झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यात ४१ तर पातूर तालुक्यात ५० टक्के कपाशीची पेरणी झाली.