अकोट तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:32+5:302021-06-20T04:14:32+5:30
विजय शिंदे अकोट : तालुक्यातील शेती क्षेत्र हे गोडेपाणी व खारेपाणी पट्ट्यात विभागलेले आहे. खारेपाणी पट्ट्यातील शेती ही निसर्गाच्या ...
विजय शिंदे
अकोट : तालुक्यातील शेती क्षेत्र हे गोडेपाणी व खारेपाणी पट्ट्यात विभागलेले आहे. खारेपाणी पट्ट्यातील शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असते, तर गोडेपाणी पट्ट्यात बारमाही पिके घेतली जातात. मात्र, खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला देत कृषी विभागाने यंदा १५०० हेक्टरने सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याच्या अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यावर्षी उगवण क्षमतेवरून हमी घेण्याच्या वादात बाजारपेठेत सोयाबीनचा तुटवडा असला, तरी इतर जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी सोयाबीन आणले आहे.
अकोट तालुक्यात प्रारंभी सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. नदी, नाल्यांना येत असलेला पूर हा सातपुड्याच्या जंगलात सर्वाधिक पाऊस झाल्याने येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, रुंद वाफा, सरी किंवा पट्टा पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तालुक्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा असतो. या भागातील कापसाचा रुई व रुईधागा चांगल्या प्रतीचा असल्याने विदेशात सुद्धा मागणी असते. त्यामुळे कॉटन बेल्ट अशी ओळख असलेल्या या भागात सोयाबीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५०० हेक्टरने सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
-------------------------
कृषी विभागामार्फत गावागावांत जनजागृती
कृषी विभागामार्फत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना बीजप्रकियेचे प्रात्यक्षिक करून दाखवून जनजागृती केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करण्यासाठी स्पर्धेचे सुद्धा आयोजन केले. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
--------------------------
पावसाअभावी पेरण्या रखडल्या!
अकोट तालुक्यात अद्यापही मुबलक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. गतवर्षी दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. शिवाय ‘लॉकडाऊन’मुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. अशा स्थितीत सावधानतेचे पाऊल उचलत शेतकरी पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
------------------------------
कपाशीचा पेरा ३७ हजार हेक्टरवर!
अकोट तालुक्यात कपाशी आणि सोयाबीन सोबतच इतर आंतरपिके घेतली जातात. यावर्षी कपाशी ३७ हजार हेक्टर, सोयाबीन १२ हजार ५०० हेक्टर, तीळ १०० हेक्टर, तूर ५ हजार हेक्टर, मूग ८ हजार हेक्टर, उडीद २ हजार ५०० हेक्टर, ज्वारी २ हजार हेक्टर, मका ७५० हेक्टर क्षेत्रफळावर पेरणी होण्याचा सर्वसाधारण अंदाज कृषी विभागाने वर्तविलेला आहे.
-------------------
शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया करावी, तसेच ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसी ओल असल्याची खात्री करून पेरणी करावी. सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी यशस्वी पेरणीच्या अष्टसूत्रीचे तंत्र अवलंबावे.
- सुशांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी, अकोट.