पश्चिम वऱ्हाडात सोयाबीनला झळाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:09 AM2021-04-14T11:09:04+5:302021-04-14T11:11:55+5:30
APMC News : कमीत कमी ६ हजार ५०० तर जास्तीत जास्त ७ हजार १३१ व सरासरी ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
अकोला : यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी झालेले आहे. तर आता बाजारात सोयाबीनची आवकसुद्धा कमी होत आहे. अशा स्थितीत सोयाबीनला मागणी वाढल्याने पश्चिम वऱ्हाडात दरही वधारले आहेत. वाशीममध्ये ७ हजार १३१ तर अकोला बाजार समितीत ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. आणखी दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील अनेक दिवसांत अतिवृष्टी, कीड, अळींचा प्रादुर्भाव यांसारखी नैसर्गिक संकटे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबतीला होती. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला. अनेक शेतकऱ्यांना उत्पादनाची सरासरीही गाठता आली नव्हती. आगामी खरीप हंगाम दोन महिन्यांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे, मशागत व इतर कामांसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. अशा स्थितीत चांगले सोयाबीन बियाण्याच्या दृष्टीने खरेदीकडे कल दिसून येत आहे. बाजारपेठेत सोयाबीनची आवक जरी कमी असली तरी सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. पश्चिम वऱ्हाडात सोयाबीनचे दर झपाट्याने वाढत आहेत. अकोला बाजार समितीत सोयाबीन कमीत कमी ५७०० पासून ६७५० दरम्यान विक्री झाले. मंगळवारी सोयाबीनला सरासरी ६६०० दर जाऊन पोहोचला. चांगल्या दर्जाचा माल ६७०० पर्यंत विक्री झाला. तर वाशीम बाजार समितीत मंगळवारी सोयाबीनला कमीत कमी ६ हजार ५०० तर जास्तीत जास्त ७ हजार १३१ व सरासरी ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मागणीच्या तुलनेत माल कमी आल्याने वाढीव दराने खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले. ज्यांनी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतमाल घरात ठेवला होता त्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे.