गुड बोला... गोड बोला : बोलण्यातून संस्कारांची अभिव्यक्ती होते - गृहराज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील यांचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:31 PM2019-01-16T13:31:12+5:302019-01-16T13:33:47+5:30
बोलणं..खरं तर ती एक कलाच आहे. तुमच्या मनातील अभिव्यक्तीची सुंदर स्वरूपातील प्रस्तुती, शुद्ध अंतकरणांचे सादरीकरण हे बोलण्यातुन प्रगट होते
बोलणं..खरं तर ती एक कलाच आहे. तुमच्या मनातील अभिव्यक्तीची सुंदर स्वरूपातील प्रस्तुती, शुद्ध अंतकरणांचे सादरीकरण हे बोलण्यातुन प्रगट होते. तुमचे बोलणं कसे आहे यावरून तुमच्यावरील संस्कार कसे आहेत याचे मुल्यमापन ऐकणारा व तुमचे वर्तन पाहणारा समाज करीत असतो त्यामुळे बोलतांना विचार करा, व्यक्ती बोलत असला तरी त्यामागे संस्कारांची शिदोरी असते. अनेक लोक शिवराळ भाषेत बोलतात, दमदाटी करून कामे करून घेतात अशा प्रकारामुळे एखादे वेळी ऐकणारे प्रभावीत होत असले तरी ते अपवादात्मक असते. तसेच बोलणे तुमची शैली झाली तर समाज त्याचे अवलकोन करून तुमच्यावरील संस्कार कसे आहेत हे मनोमन ठरवित असते. एखादी जखम भरता येईल मात्र जिभेने केलेली जखम भरल्या जात नाही. एवढी धारदार जिभ आहे. बोचरे बोलणे, टोमणे मारणे, आवाज चढवून बोलणे हे सारे प्रकार म्हणजे जिभेने जखम करणारे प्रकार आहे. गोडच बोललं पाहिजे असे नाही मात्र ‘गुड’ अर्थात चांगले बोललेच पाहिजे. अशा बोलण्यातूनच चांगले ऋणानुबंध तयार होतात, नाती भक्कम होतात अन् त्यातुनच सकारात्मक समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. चांगले बोला सारं काही चांगल होते हा माझा अनुभव आहे.
गोड बोलता आले नाही तरी चालेल पण ‘गुड’ बोलता आलेच पाहिजे. आपल्या बोलण्यातून आपल्यावर आई-वडिलांनी केलेल्या संस्काराची प्रचीती लोकांना येते. त्यामुळे आपण त्या संस्कारांची जाण व भान ठेवले पाहिजे. अभिव्यक्ती ही चांगलीच असावी यात दूमत नाही.- डॉ.रणजीत पाटील