‘कोरोना’ बाधित रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावर विशेष लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:34 AM2020-04-17T10:34:43+5:302020-04-17T10:34:49+5:30
बाधित रुग्ण किंवा संदिग्ध रुग्णाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लोकांचा बदललेला दृष्टिकोन अन् मिळत असलेल्या वागणुकीमुळे कोरोना बाधित रुग्णांमध्ये नैराश्य पसरू नये म्हणून त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष लक्ष दिले जात आहे. ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल रुग्णांना पौष्टिक आहारासोबतच दररोज समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती ‘जीएमसी’ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे एकूणच बाधित रुग्ण किंवा संदिग्ध रुग्णाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेला आहे. त्याची प्रचिती जिल्ह्यातही पाहावयास मिळत आहे. सर्वोपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या वॉर्डात रुग्णसेवा देतात म्हणून लोकांचा डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता; पण जे लोक स्वत: कोरोना बाधित असून, या महामारीविरुद्ध लढत आहेत, त्यांना संपूर्ण उपचार होईपर्यंत समाजापासून दूरच राहावे लागत आहे. अशातच गत आठवड्यात सर्वोपचार रुग्णालयात कोरोना बाधित एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या रुग्णांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विशेष लक्ष देत आहे. त्यानुषंगाने या रुग्णांना दररोज कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी समुपदेशन केले जाते. शिवाय, तणावापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
असा दिला जातो पौष्टिक आहार
कोरोना बाधित रुग्णांना प्रामुख्याने प्रथिनेयुक्त अन्न दिले जाते. यामध्ये विशेषत: विविध कडधान्यांचा समावेश असतो. रुग्णांना दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळचे जेवण आणि आवश्यक औषधोपचार दिला जात असल्याची माहिती ‘जीएमसी’त प्रशासनाने दिली.
प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर
कोरोनावर अद्यापही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे उत्तम रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावरच कोरोनाविरुद्धची लढाई लढली जात आहे. म्हणूनच आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध औषधोपचारासोबतच रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे.
रुग्णाचे मानसिक आरोग्य राखण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शिवाय, त्यांना दैनंदिन पौष्टिक आहार दिला जात असून, त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे.
- डॉ. अपूर्व पावडे, माजी अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.