विदर्भात ‘अंनिस’च्या कामावर देणार विशेष भर
By admin | Published: October 12, 2014 11:18 PM2014-10-12T23:18:04+5:302014-10-12T23:18:04+5:30
अकोला जिल्हा मराठा मंडळ सभागृहात महाराष्ट्र अंनिसची राज्यस्तरीय विस्तारित बैठक.
अकोला : विदर्भात ह्यअंनिसह्णच्या कामावर विशेष भर देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. येथील अकोला जिल्हा मराठा मंडळ सभागृहात महाराष्ट्र अंनिसची राज्यस्तरीय विस्तारित बैठक ११ व १२ ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे, माधव बावगे व मिलिंद देशमुख यांच्यासह डॉ. हमिद दाभोलकर व अँड. मुक्ता दाभोलकर आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा अंनिसचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, बबनराव कानकिरड व राजाभाऊ बढे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील ७५ प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत विषयावर चर्चा होऊन, पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. समितीच्यावतीने पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. तसेच विधानसभेत जे उमेदवार विजयी होतील, त्यांनी कोणत्याही प्रकारे फटाक्यांची आतषबाजी न करता आनंद साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस यापुढे अंनिसतर्फे युवा संकल्प दिन म्हणून आयोजित केला जाणार आहे. त्याची सुरुवात औरंगाबाद येथे १ व २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रव्यापी युवा संकल्प परिषद आयोजनाने सुरू होणार आहे. यावर्षी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा संकल्प महिना १ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान पाळला जाणार आहे.