वाहतूक शाखेची विशेष माेहीम, बेशिस्त ६६१ ऑटोवर कारवाई!
By सचिन राऊत | Published: April 21, 2024 04:17 PM2024-04-21T16:17:53+5:302024-04-21T16:18:24+5:30
जिल्ह्यात सहा दिवस राबविली विशेष माेहीम
अकाेला : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहा दिवसांची विशेष माेहीम राबवून सुमारे ६६१ बेशिस्त व अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर माेटारवाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या ऑटो चालकाना लाखाेंचा दंड ठाेठावण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा व जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीत धाेकादायकरीत्या वाहन चालविणाऱ्यांसह अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोंवर मोटार वाहन कायदा प्रमाणे कारवाईसाठी गत १५ ते २० एप्रील या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ६६१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक लाख ३६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
यामधील ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोटार प्रादेशिक परिवहन विभाग यांनी ठरवून दिलेले नियमाप्रमाणे वाहनधारकांनी आपले वाहनांवर नंबर टाकावे, कोणीही फॅन्सी नंबर वाहनांवर टाकू नये किंवा विना नंबरचे वाहन चालवू नये, वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन चालविताना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलिस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा, तसेच ऑटो व छोट्या प्रवासी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करू नये असे आवाहन बच्चन सिंह यांनी केले आहे.