क्रिकेट सट्टय़ांवर विशेष पथकाचा छापा
By Admin | Published: June 19, 2017 04:54 AM2017-06-19T04:54:21+5:302017-06-19T04:54:21+5:30
तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात; तीन मोठे सट्टा माफिया जाळय़ात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यू तापडिया नगरातील पवन वाटिका येथे मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या सट्टा बाजारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून तीन सट्टा माफियांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कल्पेश अग्रवाल, ललित सुरेखा आणि श्याम हेडा अशी आरोपींची नावे आहेत. तर दुसर्या छाप्यात ताजमोहम्मद रेगीवाले या बुकीस ताब्यात घेतले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेल्या.
या हायहोल्टेज सामन्यात जिल्हय़ात कोट्टय़वधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला असून, न्यू तापडिया नगरमध्ये सट्टय़ाचा हा बाजार मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी या परिसरात दुपारपासूनच पाळत ठेवून सामना सुरू झाल्यानंतर दीड तासातच सट्टा बाजार चालविणार्यांवर कारवाई केली. पवन वाटिका येथून अकोल्यातील बडे सट्टा माफिया कल्पेश स्वरूपचंद अग्रवाल (३४) रा. गुलजारपुरा, ललित देवीदास सुरेखा (५५) रा. जुना भाजी बाजार जैन मंदिराजवळ आणि श्यामकुमार नरेशकुमार हेडा (४८) रा. बोरगाव खुर्द या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींकडून १५ मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप दुचाकीसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे आहेत बडे सट्टा माफिया
कल्पेश अग्रवाल, ललित सुरेखा, श्यामकुमार हेडा या तीन बड्या सट्टा माफियांना अटक करण्यात आली. यापूर्वी खदान पोलिसांनी मोहित शर्मा, संतोष मनवानी, महेश अमरनानी, विक्की गोस्वामी आणि अविनाश राजेश मेंगे या चार सट्टा माफियांना अटक केली होती. या सात सट्टा माफियांचे बडे माफिया अद्यापही मोकाट असून, पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकण्याची गरज आहे.
दीड वर्षानंतर मोठी कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने न्यू तापडिया नगरात भारत-पाक सामन्यावर सुरू असलेल्या सट्टय़ावर छापा टाकला. अकोट येथे दीड वर्षापूर्वी मोठय़ा सट्टय़ावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता दीड वर्षानंतर विशेष पथकाने बड्या सट्टा माफियांवर कारवाई केली आहे.
पोलीस अधिकारी मूग गिळून!
विशेष पथकाने सट्टा माफियांवर कारवाई केली. त्यापूर्वी खदान पोलिसांनी सिंधी कॅम्पमध्ये एका मोठय़ा सट्टा बाजारावर कारवाई केली. या दोन कारवाई वगळता सट्टा माफियांकडून मोठा हप्ता घेत त्यांना पोलीस अधिकार्यांनी खुली सूट दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारत-पाक सामन्यावर रविवारी खुलेआम सट्टा खेळण्यात येत असताना पोलिसांना हा सट्टय़ाचा बाजार दिसला नाही का, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
न्यू तापडिया नगरमध्ये मोठय़ा प्रमाणात सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. यावर पाळत ठेवून सट्टा माफियांवर कारवाई करण्यात आली असून, तीन मोठय़ा सट्टा माफियांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून तब्बल १५ च्यावर मोबाइल जप्त करण्यात आले असून, तपासात आणखी काही सट्टा माफियांची नावे समोर येत आहेत. मोठय़ा सट्टा माफियांची नावे समोर येणार असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
- हर्षराज अळसपुरे,
प्रमुख विशेष पथक, अकोला.