दुर्गम भागातील एमबीबीएस डॉक्टरांसाठी आता विशेष आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:26 PM2019-09-15T12:26:37+5:302019-09-15T12:26:56+5:30
एमबीबीएसच्या एकूण जागेच्या दहा टक्के जागा या अंतर्गत आरक्षित केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अकोला: ग्रामीण विशेषत: दुर्गम भागातील रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने ‘एमबीबीएस’च्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार एमबीबीएसच्या एकूण जागेच्या दहा टक्के जागा या अंतर्गत आरक्षित केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या वेतनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली होती.
राज्यातील दुर्गम-आदिवासी भागात आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी यापूर्वी शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनात दुपटीने वाढ केली होती; परंतु त्यानंतरही अशा भागात वैद्यकीय सेवा देण्यास एमबीबीएस डॉक्टरांचा नकार असल्याने राज्य शासनाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष आरक्षण सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाच्या एकच जागेच्या दहा टक्के जागा अंतर्गत आरक्षित करण्यात येणार आहे. या आरक्षणामुळे राज्याच्या आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल होतील आणि सरकारी सेवेत दीर्घ काळ काम करू इच्छिणाºया उमेदवारांसाठी जागा आरक्षित ठेवल्यास सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या वाढेल या अपेक्षेने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
... तर डिग्री होऊ शकते रद्द
- एमबीबीएसच्या एकूण जागेच्या दहा टक्के आरक्षण
- ४१० जागा या आरक्षणामुळे निर्माण होणार
- विशेष कोट्यातून प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना सात वर्ष ग्रामीण भागात सेवा बंधनकारक
- अन्यथा ‘एमबीबीएस’ची डीग्री रद्द होणार
ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम भागात डॉक्टरांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागातील ही स्थिती सुधारण्यासाठी यापूर्वी शासनाने डॉक्टरांच्या मानधनात वाढ केली होती. त्यानंतर विशेष आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे; परंतु यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नाही.
- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला