विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:13 AM2017-07-18T01:13:34+5:302017-07-18T01:13:34+5:30
पातूर: स्थानिक विजय टॉकीजजवळ खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १७ जुलैच्या सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास धाड टाकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर: स्थानिक विजय टॉकीजजवळ खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १७ जुलैच्या सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी सहा जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडून अटक केली. यावेळी जुगार खेळणारा एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. यातील आरोपींजवळून ५,२१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पातूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, त्यावर पोलिसांचा कुठलाही वचक नसल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. विशेष पथकाने या ठिकाणी येऊन कारवाई करताच पातूर पोलीस या जुगार अड्ड्यावर नाममात्र कारवाई करून आपण किती तत्पर आहोत, हे दाखवून तोऱ्यात मिरवितात; परंतु येथे अवैध धंदे त्यानंतरही सुरूच आहेत, हे दाखविणारी घटना सोमवारी घडली. पातूर पोलिसांनी सोमवारी विजय टॉकीज परिसरात शे. इम्रान शे. अन्सार रा. मुजावरपुरा याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तेथून वरलीच्या चिठ्ठ्या व रोख ४७० रुपये असा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाईच्या काही तासानंतरच याच परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अळसपुरे यांच्यासह विशेष पथकाने धाड टाकली असता पुरुषोत्तम हिंमत राऊत (२५), अण्णा पंढरी अंभोरे (४४), समाधान पुंडलिक वगळे (४२), पांडुरंग प्रल्हाद चवरे (२६), शे. इम्रान शे. अन्सार (२५), राम श्रीराम चव्हाण (३५) या सहा जणांकडून रोख १२१० रुपये व चार हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल असा एकूण ५,२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.