विशेष पथकाचा अवैध धंद्यांवर वचक!

By admin | Published: May 3, 2017 01:02 AM2017-05-03T01:02:14+5:302017-05-03T01:02:14+5:30

दोन महिन्यांमध्ये १४२ आरोपींना अटक: ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Special squad of illegal businesses | विशेष पथकाचा अवैध धंद्यांवर वचक!

विशेष पथकाचा अवैध धंद्यांवर वचक!

Next

अकोला : पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनातील विशेष पोलीस पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापे घालून एकप्रकारचा वचक निर्माण केला. दोन महिन्यांमध्ये अवैध दारू विक्री, वरली जुगारावर छापे घालून विशेष पोलीस पथकाने १४२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या सातत्याच्या छाप्यांमुळे अवैध धंद्यांना आळा बसला आहे.
मावळते पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ५ मार्च रोजी जुने शहरचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्याकडे विशेष पथकाची जबाबदारी सोपविली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व एपीआय अळसपुरे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्ये करणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाया करून जरब बसविली. मार्च व एप्रिल माहिन्यामध्ये विशेष पथकाने बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर, रामदासपेठ, सिव्हिल लाइन, एमआयडीसी, अकोट यासह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर छापे घालून १ एप्रिल २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ या अकरा महिन्यांमध्ये जुगारांच्या छाप्यामधून ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मार्च व एप्रिल २०१७ या दोन महिन्यांमध्ये अकरा महिन्यांच्या तुलनेत जवळपास पाचपट १७ लाख १० हजार ७३५ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मार्च व एप्रिल २०१७ या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १३२ जणांना जुगार कारवायांमध्ये अटक केली, तसेच मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर एकूण सहा गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण २० लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एवढेच नाही, तर विशेष पोलीस पथकाने जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई २९ एप्रिल रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोनिका रेस्टॉरंटवर करून एकूण १० लाख ८९ हजार रुपये किमतीची देशी व विदेशी दारू आणि ३ लाख ३० हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली होती.
यासोबतच विशेष पथकाने ६ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणी परिसरातून १३ लाख ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखासुद्धा जप्त केला होता. पोलीस अधीक्षकांच्या सातत्यपूर्ण छाप्यांमुळे अवैध धंदेवाइकांमध्ये चांगलीच जरब बसली असून, अनेकांनी अवैध धंदे बंद केले आहेत.

Web Title: Special squad of illegal businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.