माळेगाव बाजारातील जुगारावर विशेष पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 06:23 PM2019-08-17T18:23:34+5:302019-08-17T18:23:50+5:30
आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील माळेगाव बाजार या गावात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी शनिवारी दुपारी छापा टाकून आठ जुगार यांना रंगेहाथ अटक केली. दोन जुगारी फरार होण्यात यशस्वी झाले असून या जुगारींकडून तब्बल १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माळेगाव बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे बहाकर यांनी पथकासह माळेगाव बाजार येथील जुगारावर छापा टाकून जेठमल दामोदर गांधी रा. दानापूर, अनिल महादेव रावणकर, रा काकनवाडा, दयाराम इश्राम सावळे रा. माळेगाव, जाफरखान हबीब खान रा माळेगाव, राजाराम इश्राम सावळे रा, माळेगाव, शेख राजीक शेख सुभान रा. माळेगाव, प्रवीण जानकीराम काळे रा. माळेगाव, जगन्नाथ रघुनाथ आढाव रा. काकनवाडा, जिल्हा बुलढाणा या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या जुगार अड्डयावरून एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.