नायगावातील दारू अड्ड्यांवर विशेष पथकाची छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:20 PM2020-04-06T17:20:34+5:302020-04-06T17:20:41+5:30
एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथील फरिदा नगरमध्ये दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा छापा टाकला. या गावठी दारू अड्ड्यांवरून एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांचे पथक रविवारी रात्री उशिरा अकोला शहरात अवैद्य धंद्यावर छापा करण्यासाठी गस्तीवर असताना त्यांना फरिदा नगर नायगाव येथे दोन ठिकाणी गावठी दारू अड्डे सुुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने सापळा रचून फरिदा नगर येथे छापा टाकून हुसेन बुद्दू नौरंगाबादी (३२) रा. फरिद नगर नायगाव, शकिल ईब्राहीम परसुवाले (२५) रा. फरिदा नगर नायगाव तसेच जमिला महेबुब भैरोवाले रा. जाम मोहल्ला गवळीपुरा या तिघांना गावठी दारू गाळत असताना रंगेहात अटक केली. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्यानंतर त्यांच्याकडून एकूण २२० लीटर गावठी हातभट्टीची दारू किंमत २२ हजार रुपये, १५ टिनाचे व प्लास्टिकच्या ड्राममध्ये मोहामाच सडवा ३ हजार लीटर किंमत २ लाख रुपये, गावठी दारू उपयोगी गूळ, तुरटी तसेच साहित्य किंमत ११ हजार रुपये असा एकूण २ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तीनही आरोपींविरुद्ध अकोट फाइल पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ६५ (ई) (क) (ड) (फ) आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह कलम १८८, २६९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभाग झोपेत
ज्या विभागावर गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आहे, तो अकोल्यातील उत्पादन शुल्क विभाग सपशेल झोपेत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सायंकाळी रामदासपेठ पोलिसांनी एका गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. त्यानंतर रात्री पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने मोठ्या दारू अड्ड्यावर छापा टाकून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त केला. अवैधरीत्या गावठी दारू अड्डे सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाने एकही कारवाई न केल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.