अकोल्यात शाळा- महाविद्यालयजवळ प्रतिबंधित गुटखा विक्रेता विरुद्ध विशेष पथकाची मोहीम
By नितिन गव्हाळे | Published: September 15, 2022 04:41 PM2022-09-15T16:41:09+5:302022-09-15T16:41:43+5:30
पोलिसांची अकोल्यात विविध ठिकाणी कारवाई
अकोला: शाळा, महाविद्यालय हे तंबाखू प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले असतानाही या परिसरात तंबाखू, प्रतिबंधित गुटखा व सिगारेट विक्री होत आहे. पोलिसांनी अशा विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असून गुरुवारसुद्धा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तीन आरोपींवर कारवाई केली. अकोट फैल परिसरातील मनपाच्या शाळेसह सु. म. डामरे सर्वोदय विद्यालयाजवळ प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या दुकानातून तंबाखू, प्रतिबंधित गुटक्याची पदार्थ विक्री केली जात होती.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करीत आरोपी जुबेर अहेमद नशीर अहेमद (३७, रा. वॉर्ड नं.एक, संजय नगर, नायगाव) यांच्या सर्वोदय विद्यालय जवळील जुबेर किराणामधून तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट असा ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय आकाश गुलाबराव भालेराव (३६, रा. मनपा शाळा नं.१८, राजगुरू मार्ग, अशोक नगर) यांच्या यश किराणा दुकानात तंबाखूच्या पुड्यांचा ९५० रुपायांचा मुद्देमाल मिळून आला.
वसीम किराणा दुकानात रमेश शामलाल खरारे (४२, रा.मनपा शाळा नं.६ जवळ, लाडीस फैल) यांच्या जवळ सिगारेट, बिडी, तंबाखू असा एकूण ९६५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तिन्ही आरोपीविरुद्ध अकोट फैल पोलिस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आलेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केली.