बालकांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे विशेष कार्यदल गठित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:58+5:302021-05-29T04:15:58+5:30
अकोला : लहान बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे ...
अकोला : लहान बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवार, २८ मे रोजी दिला असून, या विशेष कार्यदलात १८ तज्ज्ञांचा समावेश आहे.
या विशेष कार्यदलाचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर असून, सदस्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अकोला अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक तथा सदस्य सचिव डॉ. विनीत वरठे, डॉ. मनोज ठोकळ, डॉ. अनुप जोशी, डॉ. अंजली सोनोने, डॉ. एस.एस. काळे, डॉ. नरेंद्र राठी, डॉ. अनुप कोठारी, डॉ. नरेश बजाज, डॉ. विजय आहुजा, डॉ. पार्थसारथी शुक्ला, डॉ. किशोर ढोले, डॉ. अभिजित नालट, डॉ. आशुतोष पालडीवाल, डॉ. शिरीष देशमुख, डॉ. विशाल काळे इत्यादी बालरोगतज्ज्ञांचा समावेश आहे.
गठित करण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स’ने कोविड संसर्गजन्य आजारावर आळा घालण्यासंदर्भात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्णव्यवस्थापनसंहिता, योग्य औषधोपचार, कोविड रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता इत्यादी सुनिश्चित करण्याकरिता स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.