राज्यातील ७४ आंतरराष्ट्रीय शाळांमधील ९00 शिक्षकांना विशेष प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:27 PM2019-06-12T12:27:02+5:302019-06-12T12:27:12+5:30
जिल्हा परिषदेच्या ६0 आणि खासगी १४ शाळांमधील एकूण ९00 शिक्षकांना मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले.
अकोला: महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या ६0 आणि खासगी १४ शाळांमधील एकूण ९00 शिक्षकांना मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्यांमध्ये देण्यात येणार आहे.
डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने राज्यभरातून जिल्हा परिषदेच्या ६0 आणि १४ खासगी शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता दिली. या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने ठरविलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देता यावे, या दृष्टिकोनातून ७४ शाळांमधील जवळपास ९00 शिक्षकांना उन्हाळी सुटीमध्ये मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आठवडाभर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम कसा असेल, तो कसा शिकवायचा, मुलांना येणाºया अडचणी कशा ओळखायच्या, त्यांना शिक्षणासाठी कसे प्रोत्साहित करायचे, यासोबतच शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव विषय विस्तारित शिकविण्यात येणार आहे. या शाळांमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यात येणार असल्याने, शिक्षकांना त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)
अकोला जिल्ह्यातून २0 शिक्षकांना प्रशिक्षण
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विशेष प्रशिक्षणामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषद शाळांमधून एकूण २0 शिक्षक सहभागी झाले होते. या सर्व शिक्षकांना पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. पहिली ते तिसºया वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राहणार आहे. इयत्ता चौथीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राहणार आहे.