रणधुमाळीला गती; पावसातही मतदारांच्या गाठीभेटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:37+5:302021-09-26T04:21:37+5:30
अकोला: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असतानाच जिल्ह्यात ...
अकोला: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असतानाच जिल्ह्यात निवडणुकांच्या रणधुमाळीला गती आली आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून दररोज बरसणाऱ्या पावसातही उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत असून, विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे दौरे आणि बैठकांनाही वेग आला आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १४ गट आणि सात पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी २१ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली असून, जेथे अपील दाखल नाही तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोटनिवडणुकांच्या रणधुमाळीला गती आली आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात दररोज अधूनमधून जोरदार पाऊस बरसत असला तरी, पावसातही उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या संबंधित गट आणि पंचायत समित्यांच्या गणांतील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भाजप, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस इत्यादी प्रमुख राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे दौरे सुरू झाले असून, बैठका, मेळावे घेण्यात येत आहेत.
.................................................
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले आज जिल्हयात !
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवार, २६ आॅक्टोबर रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पक्षाच्या उमेदवारांसाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी ते बैठका घेणार आहेत. रविवारी रात्री त्यांचा अकोल्यात मुक्काम राहणार असून, सोमवार २७ सप्टेंबर रोजी अकोला येथे भारत बंद आंदोलनात नाना पटोले सहभागी होणार आहेत, असे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी सांगितले.
.............................फोटो........................
‘वंचित’चे तालुकानिहाय
मेळावे; सर्कलनिहाय दौरे !
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्ह्यातील सातही तालुक्यात शनिवार २४ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले असून, रविवारपासून जिल्हा परिषद सर्कलनिहाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे सुरू करण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेतील पक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सांगितले.
..............................................
शिवसेनेच्या सर्कलनिहाय बैठका सुरू!
पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सर्कलनिहाय शिवसेनेच्यावतीने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवारांसह मतदारांशी संपर्क साधून संवाद साधण्यात येत आहे, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद गटनेता गोपाल दातकर यांनी सांगितले.
..............................................
भाजपच्या बूथनिहाय बैठका !
पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांत भाजपच्यावतीने बुथनिहाय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच उमेदवारांसह पक्षाच्या बूथनिहाय पदाधिकाऱ्यांकडून मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे, असे भाजपचे गिरीश जोशी यांनी सांगितले.