गांधी रोडवरील खुनाच्या तपासाला गती
By admin | Published: September 24, 2016 03:10 AM2016-09-24T03:10:22+5:302016-09-24T03:10:22+5:30
गांधी रोडवरील चौपाटीवर आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून झाला होती हत्या; आरोपीला २८ पर्यंत पोलीस कोठडी.
अकोला, दि. २३- गांधी रोडवरील चौपाटीवर आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून आकोट फैल येथील २४ वर्षीय युवकाची हत्या प्रकरणातील आरोपी गुलाम हुसेन औलाद हुसेन याला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जमील अली नजरत अली (२४) हा इराणी वसाहत येथील रहिवासी गुलाम हुसेन औलाद हुसेन याच्यासोबत गांधी रोडवरील चौपाटीवर आला होता. चौपाटीवरील सरिता नामक हॉटेलमध्ये दोघांनी चर्चा सुरू केली. या चर्चेत आर्थिक कारणावरून जमील अली व गुलाम हुसेन या दोघांमध्ये वाद झाले. वाद विकोपाला गेल्यामुळे जमील अली हा हॉटेलमधून बाहेर पडला आणि दीपिका आइस्क्रीम पार्लरसमोर आला असता, तेवढय़ात त्याच्या मागाहून चार ते पाच आरोपी आले आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यामध्ये जमील अली याच्या मानेवर व छातीवर गंभीर जखमा झाल्याने त्याला तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले; मात्र काही वेळातच जमील अलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुलाम हुसेन औलाद हुसेन याला अटक केली.
या हत्याकांड प्रकरणामध्ये इराणी वसाहत येथून आणखी एकास सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत असून, या आरोपीचा हत्याकांडात सहभाग असल्याचे जवळपास समोर आले आहे. जमील अली नजरत अलीच्या खून प्रकरणात आता दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, आणखी दोघांचा या हत्याकांडात सहभाग असल्याची माहिती आहे.
म्हणे, पहेलवान बोला कर..
शेख मुशीर आणि शेख राजू हे दोघे चांगले मित्र होते. दोघेही सोबतच राहत असताना शेख मुशीर हा राजूला वारंवार डिवचत असे, मला पहेलवान म्हणून हाक मारत जा, असे तो राजूला सांगत होता. याच कारणावरून दोघांमध्ये खटके उडत असत. शुक्रवारीही अशाच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती असून, यामधूनच ही हत्या करण्यात आली.
१३ चोर्यांतील देवाण-घेवाण
जमील अली नजरत अली आणि गुलाम हुसेन औलाद हुसेन या दोघांनी सोबत १३ चोर्या केल्याची माहिती आहे. या १३ चोर्यांमधील मुद्देमाल आणि रोख घेवाण-देवाणसाठी त्यांची गुरुवारी चर्चा झाली. यामध्ये जमील अली नजरत अली याने गुलाम हुसेन याच्याकडे तब्बल एक लाख रुपये असल्याचे सांगून त्याला ही रक्कम मागितली, तर गुलाम हुसेन याने ५0 हजार देण्याची तयारी दर्शविली; मात्र ही रक्कम घेण्यास त्याने नकार दिला. या वादानंतरच जमील अली नजरत अलीची हत्या केली.