बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचा वेग मंदावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:42 AM2020-06-03T10:42:45+5:302020-06-03T10:43:01+5:30
१९४ प्रवासी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्गाला प्रतिबंधाच्या उपाययोजनांमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवासाची संधी मिळाली. त्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्यांची संख्या ३८,०३९ वर पोहोचली आहे. त्यापैकी १९४ प्रवासी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली.
तसेच त्यांना संस्था तसेच गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता केवळ १,७९४ प्रवाशांचा अलगीकरण कालावधी शिल्लक आहे.
मंगळवारी एकाच दिवशी केवळ १९४ प्रवासी दाखल झाले असून, त्यापैकी ६९ प्रवासी रेड झोन जिल्ह्यातून आले आहेत. रेड झोनमधून आलेल्या प्रवाशांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याने त्यांना सात दिवस संस्था तसेच होम क्वारंटीन ठेवण्यात आले आहे. १५ मेपासून शनिवारपर्यंत दाखल झालेल्या एकूण ११,३५२ पैकी १,७९४ प्रवाशांचा अलगीकरण कालावधी शिल्लक आहे. त्यांना गावातच अलगीकरणात ठेवले जात आहे. दैनंदिन प्रवासी मोठ्या संख्येने येत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाची दहशत आणखीच वाढत आहे. रेड झोन नसलेल्या जिल्ह्यातून २,२८० तर परप्रांतातून आलेल्यांची संख्या १,२५९ एवढी आहे.