पोलीस आयुक्तालयाच्या हालचालींना वेग!
By admin | Published: January 15, 2016 02:00 AM2016-01-15T02:00:37+5:302016-01-15T02:00:37+5:30
अकोला जिल्हा योजनांच्या प्रारूप आराखड्याला दिली जाणार मंजुरी.
अकोला : पोलीस आयुक्तालयाला शासनाकडून मंजुरी मिळून सहा महिने उलटले आहेत. हळूहळू का होईना, पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी मुंबईच्या एका चमूने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या उपस्थितीत खदान पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या कार्यकाळातच पोलीस आयुक्तालय निर्मितीसंदर्भातील प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविला होता; परंतु तत्कालीन आघाडी शासनाने आयुक्तालयास परवानगी दिली नव्हती. महायुती सत्तेत आल्यावर पोलीस आयुक्तलयास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा होती. सहा महिन्यांपूर्वी अखेर अकोल्यात पोलीस आयुक्तालय मंजूर झाले; परंतु शासनाने आयुक्तालयाला मंजुरी प्रदान केली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, अंदाजपत्रक अद्यापपर्यंत मंजूूर केलेले नाही. गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे हे एका कार्यक्रमासाठी अकोल्यात आले असता, त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीच्या कामास सुरुवात होईल, असे सांगितले होते. त्यानुसार आयुक्तालयाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच अभियंत्यांच्या एका चमूने खदान पोलीस ठाण्यातील जागेची मोजमाप केले. झाडे मोजून त्यांना क्रमांक दिले. या ठिकाणी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) चे कार्यालय उभारण्यात येणार आहेत. गुरुवारी मुंबईतील एका चमुने पुन्हा खदान पोलीस ठाण्यातील जागेची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, महापालिकेचे नगररचनाकार उपस्थित होते. पोलीस अधीक्षक ग्रामीणचे कार्यालय उभारणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.