सीसीआयकडून कापसाच्या खरेदीला वेग, खरेदी केंद्रांवर नोंदणीसह खरेदी सुरू
By रवी दामोदर | Published: December 16, 2023 03:42 PM2023-12-16T15:42:53+5:302023-12-16T15:43:19+5:30
अकोला : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) चालू हंगामामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३४ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू ...
अकोला : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) चालू हंगामामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३४ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून, खरेदीला वेग आला आहे. कापसाची समर्थन मूल्यांतर्गत खरेदी करण्यासाठी सीसीआय केंद्राची नोडल एजन्सी असून, शेतकऱ्यांच्या नोंदणीसह खरेदी सुरू आहे.
यंदा मान्सून उशिराने राज्यात दाखल झाल्याने खरीप हंगाम लांबला. सध्या मोजक्याच भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे घेऊन सीसीआय केंद्रावर नोंदणी करता येणार आहे. सीसीआयने सर्व खरेदी केंद्रांवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून एमएसपीमध्ये कापूस खरेदीसाठी व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांनी सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर नोंदणी करून घ्यावी, तसेच कोणत्याही अडचणीसाठी जवळच्या सीसीआय खरेदी केंद्राच्या प्रमुखांशी संपर्क करण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापकांनी केले आहे.
२० हजार क्विंटल कापसाची खरेदी
कापूस हंगाम २०२३-२४ मध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी नोंदणी तथा खरेदी सुरू केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांकडून २० हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यातील सात केंद्रांवर नोंदणी सुरू
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)द्वारे विदर्भात ३४ खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरू केली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक कापूस असून, मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यासाठी सीसीआयकडून सात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे