खारपाणपट्टय़ात टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा होणार अडीच कोटी खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:21 AM2017-09-13T01:21:41+5:302017-09-13T01:21:41+5:30
अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा अडीच कोटी रु पयांचा खर्च होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा अडीच कोटी रु पयांचा खर्च होणार आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोराजवळील उन्नई बंधार्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्ग त गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण आहे. त्यानुषंगाने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार १0 सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत अकोट आणि देवरी फाटा येथील जमिनीखालील पाण्याच्या टाकीतून ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अकोट आणि देवरी फाटा येथून या गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वाहतूक खर्च आणि टँकर भाड्यापोटी दरमहा २ कोटी ५0 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. हा खर्च भागविण्यासाठी टंचाई अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे.
पाच शासकीय, ४0 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा!
पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामध्ये पाच शासकीय टँकर आणि ४0 खासगी टँकरचा समावेश आहे. ४0 खासगी टँकरद्वारे भाडे तत्त्वावर पाणीपुरवठा करण्यासाठी हैदराबाद येथील एका निविदाधारकासोबत जिल्हा प्रशासनामार्फत करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार पाणीटंचाई संपुष्टात येईपर्यंंंत संबंधित गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.