स्पिरिट खरेदी-विक्री करणार्यांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:57 AM2017-11-10T01:57:57+5:302017-11-10T01:59:20+5:30
अकोला : छत्तीसगड येथून निघालेला आणि गोवा येथे जात असलेला रेक्टीफाइड आरएस नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेला स्पिरिटचा ट्रक बुधवारी उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्यानंतर या स्पिरिटची विक्री करणारा व खरेदी करणार्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : छत्तीसगड येथून निघालेला आणि गोवा येथे जात असलेला रेक्टीफाइड आरएस नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेला स्पिरिटचा ट्रक बुधवारी उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्यानंतर या स्पिरिटची विक्री करणारा व खरेदी करणार्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या चालक व क्लीनरला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.
छत्तीसगड येथील केए 0१ बी ६२८१ क्रमांकाचा रेक्टीफाइड स्पिरिटचा एक टँकर तब्बल १२ हजार लिटर स्पिरिट घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूर्तिजापूर ते अकोला या दरम्यान पाळत ठेवून स्पिरिट घेऊन जाणारा ट्रक मूर्तिजापूरजवळील एका ढाब्यावर जप्त केला. या ट्रकमधील १२ हजार लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले असून, सदर स्पिरिटची किंमत तब्बल १५ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. या ट्रकचा चालक पिन्नर पेरुमल तेलवन आणि क्लिनर सत्तार अब्दुल रहिम या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दाघांचीही पोलीस कोठडीत रवानगी केली. या स्पिरिटचा छत्तीसगडमधील विक्रेता व गोवा किंवा अकोल्यातील खरेदीदार तसेच त्यांचा दलाल या तिघांचा शोध उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सुरू केला आहे.
बडे मासे लागणार गळाला!
स्पिरिटची वाहतूक करणार्या चालक व क्लीनरची चौकशी करण्यात येत आहे; मात्र भाषेची अडचण दुसर्या दिवशीही कायम असल्याने अधिक माहिती समोर आली नाही; मात्र भाषेचा अनुवाद करणारा मिळाल्यानंतर सदर प्रकरणातील दोषींचे चेहरे समोर येणार असल्याची माहिती आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल आणि योग्यरीत्या तपास झाल्यास बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.